Join us

काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 19:00 IST

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संजय निरुपम काँग्रेसच्या तिकिटावर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.

Sanjay Nirupam ( Marathi News ) : काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर आता माजी खासदार संजय निरुपम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार, हे निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत ३ मे रोजी संजय निरुपम शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार आहे. निरुपम यांची तब्बल दोन दशकांनंतर घरवापसी होणार आहे. कारण त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेपासूनच झाली होती.

संजय निरुपम यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यानंतर आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती निरुपम यांच्याकडून देण्यात आली आहे. मुंबईतील उत्तर भारतीय चेहरा अशी संजय निरुपम यांची ओळख असून त्यांनी मुंबई काँग्रेसचंही नेतृत्व केलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे गेली. उद्धव यांनी या जागेवर अमोल किर्तीकर यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यामुळे नाराज झालेल्या संजय निरुपमांनी उद्धव ठाकरेंसह काँग्रेस नेतृत्वावर जोरदार टीका केली. परिणाम त्यांची काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आता निरुपम यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, संजय निरुपम हे शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून तिकीट मिळवण्यास प्रयत्नशील होते. मात्र नुकतीच या जागेवर शिंदे यांच्याकडून रवींद्र वायकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे निरुपम यांना आता रवींद्र वायकरांचा प्रचार करावा लागणार आहे.

काँग्रेसपासून वेगळं होताच निरुपमांनी केला होता घणाघाती हल्ला

काँग्रेसकडून हकालपट्टीचे पत्रक काढण्यात आल्यानंतर संजय निरुपम यांनी पक्षावर घणाघाती टीका केली होती. "काँग्रेसचा सुरुवातीपासूनच फोडा आणि राज्य करा, यावर विश्वास आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी राजकारणासाठी देशाचे दोन तुकडे केले. फाळणीला सर्वस्वी काँग्रेसच जबाबदार आहे. आजही त्यांचा नेता भर सभेत लोकांना त्यांची जात विचारतो. लोकांना जाती-धर्मात वाटणे काँग्रेसची जुनी सवय आहे. त्यावर आता देशातील लोक नाराज आहेत आणि त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसते," असं ते म्हणाले होते.

टॅग्स :संजय निरुपमएकनाथ शिंदेशिवसेनामुंबई उत्तर पश्चिममहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४