मुंबईचा नवा विकास आराखडा बिल्डरधार्जिणा- संजय निरुपम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 08:53 PM2018-04-25T20:53:01+5:302018-04-25T20:53:01+5:30
'हा विकास आराखडा कमी आणि आपत्तीजनक आराखडा जास्त'
मुंबई : मुख्यमंत्र्यांनी आज विकास आराखड्याला मंजुरी दिली. या विकास आराखड्यावरुन काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. हा विकास आराखडा कमी आणि आपत्तीजनक आराखडा जास्त वाटतो, अशा शब्दांमध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी विकास आराखड्यावर टीकेची झोड उठवली. हा आराखडा बिल्डरधार्जिणा असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईतील ज्या जमिनी ना विकास क्षेत्रामध्ये होत्या, त्या आता खुल्या होणार आहेत आणि याचा लाभ मोठ्या विकासकांना मिळणार आहे, असं निरुपम यांनी म्हटलं.
'एसआरए योजनेमध्येही फेरबदल केले जात आहेत. जे अतिशय चुकीचे आहेत, नुकसानदायक आहेत. व्यावसायिक कॉम्प्लेक्ससाठी ५ एसएसआय मिळणार आहे. हे भयंकर आहे. यामुळे कमला मिल्समध्ये ज्या प्रकारे अंदाधुंद कमर्शिअल बांधकाम झालेले आहे. तशी अनेक बांधकामे होतील. यामुळे मुंबईचे नुकसान होईल. मुंबई शहराचा एफएसआय उपनगरांपेक्षा कमी आहे. पहिल्यांदाच शहरामध्ये ३ एफएसआय दिला जाणार आहे. ज्यामुळे मुंबईत राहणे आणखी दाटीवाटीचे होईल', असं निरुपम म्हणाले.
'संपूर्ण मुंबईमध्ये ज्या विभागात २२% निवासी क्षेत्र आहे, तिथे त्यांना ५०% निवासी क्षेत्र करायचे आहे. जी काही नवीन घरे बांधायची आहेत, ती शहराच्या बाहेर बांधावीत, अशी आम्ही पूर्वीपासून मागणी करत होतो. पण या नवीन विकास आराखड्यामुळे घरांची संख्या वाढणार आहे. नवीन १० लाख परवडणारी घरे बांधली जाणार आहेत, असे मुख्यमंत्री म्हणतात. पण माझा त्यांना प्रश्न आहे की, अगोदरच मुंबईतील सव्वापाच लाख घरे विक्रीविना पडून आहेत. मग अजून १० लाख घरे का बनवली जात आहेत? तसेच मुख्यमंत्री म्हणतात परवडणारी घरे बांधणार, तर मग परवडणाऱ्या घराची व्याख्या काय आहे आणि असे घर काय किमतीत मिळणार? जर सध्याच्या किंमतीनुसार ते १ करोड रुपयांना मिळणार असेल, तर ते परवडणारे असेल का? हा विकास आराखडा दुसरे-तिसरे काही नसून बिल्डरांना फायदा मिळवून देणारा आहे,' अशी टीका निरुपम यांनी केली.