Join us

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लागेल; विजय वडेट्टीवार यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 2:57 PM

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात नेमका निकाल कधी लागणार आहे, याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात नेमका निकाल कधी लागणार आहे, याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. १६ मार्च रोजी शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वादावर सुनावणी पूर्ण झाली. शिंदे गटाचे १६ आमदार पात्र ठरणार की अपात्र? याभोवती हे सगळं प्रकरण उभं राहिलं असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून उद्या किंवा परवा म्हणजेच ११ मे किंवा १२ मे रोजी निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनापीठासमोर ही सुनावणी झाली, ते पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ होतं. त्यापैकी एक न्या. एम आर शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत.  त्यामुळे निकाल यायचा असेल तर त्याच्याआधीच येणार हे स्पष्ट आहे. न्यायमूर्तींच्या निवृत्तीचा शेवटचा दिवस हा समारंभाचा असतो. अगदी त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता तशी कमी असते. १३ आणि १४ मे रोजी शनिवार आहे. त्यामुळे उद्या ११ मे किंवा परवा १२ मे रोजी निकाल येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याचदरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

राज्यसत्तासंघर्षाचा निकाल सोमवारपर्यंत न आल्यास...; अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली महत्त्वाची माहिती

सत्तासंघर्षाचा निकाल एक-दोन दिवसात अपेक्षित आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकालाबाबत संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासंदर्भात संभ्रम निर्माण केला गेला होता. सत्तासंघर्षाचा निकाल हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लागेल आणि अशीच सगळीकडे चर्चा आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष आणि विधिमंडळाच्या कामकाजात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात नाही तर विधानसभेतच होणार, असा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे. १६ आमदार अपात्रतेचा विषय, त्यानंतर आणखी काही आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या विधिमंडळापुढे आहे. त्याबाबत सर्वांना नोटिसा पाठविल्या आहेत. काहींनी मुदत वाढवून मागितली आहे. विधानसभेचे जे नियम आहेत, त्यानुसार कारवाई होईल, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :विजय वडेट्टीवारमहाराष्ट्र सरकारएकनाथ शिंदे