मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. मंत्रिपदाची शपथविधी सुरु असून अजित पवार आदित्य ठाकरे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व मंत्र्यांना शपथ दिली. मात्र काँग्रेसचे नेते अॅड के.सी. पाडवी यांच्या शपथविधीवेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चिडल्याचे पाहायला मिळाले.
अक्कलकुवा मतदारसंघातील काँग्रेस नेते अॅड के.सी. पाडवी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर थोडक्यात मनोगत व्यक्त केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चिडल्याचे दिसून आले. शपथविधिमध्ये ठरवून दिलेल्या मजकूराव्यतिरिक्त काहीही बोलायचं नाही, असेही कोश्यारी यांनी ठणकावून सांगितले. तसेच तुम्हाला शपथ कशी घ्यायची ते ठाऊक नसेल तर समोर शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे बसले आहेत त्यांना विचारा असंही राज्यपालांनी पाडवी यांना सुनावलं. यानंतर राज्यपालांनी के. सी. पाडवी यांना पुन्हा शपथ घेण्यास सांगितले. राज्याच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी, काँग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जुन खर्गे देखील मुंबईत दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरा मंत्र्यांच्या नावांची यादी राजभवनावर पाठविली आहे. शामियाना उभारून शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांच्या दिमाखदार शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर पार पडला होता.