मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात काँग्रेसकडून अशोक चव्हाण, अमित देशमुख यांच्यासह 10 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.
ठाकरे सरकारमध्ये 'आदित्य', पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात घेणार शपथ
काँग्रेसकडून अशोक चव्हाण, के. सी. पाडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनील केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख या नेत्यांची कॅबिनेटपदी वर्णी लागली आहे. तसेच सतेज पाटील, विश्वजीत कदम राज्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र प्रणिती शिंदे यांची मंत्रिपदाची संधी यंदाही हुकली आहे. काँग्रेसच्या मंत्रिमंडळाच्या यादीत दहापैकी चार कॅबिनेट मंत्री एकट्या विदर्भाचे आहे. तसेच विधानसभेचे अध्यक्षपद विदर्भाकडे असून विदर्भातून निवडून आलेल्या आमदारांची संख्या देखील जास्त आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी, काँग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जुन खर्गे हेही मुंबईत दाखल झाले आहेत.
मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात सोमवारी दुपारी एक वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना शपथ देतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरा मंत्र्यांच्या नावांची यादी राजभवनावर पाठविली आहे. शामियाना उभारून शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेकडून माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पत्ता कट करण्यात आला असून अब्दुल सत्तार यांना संधी देण्यात आल्याची माहिती आहे. या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांच्या दिमाखदार शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर पार पडला होता.