Join us  

‘भारत जोडो’साठी काँग्रेस नेत्यांचा चालण्याचा सराव; ७ नोव्हेंबर रोजी ‘भारत जोडो’ राज्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 6:21 AM

मागील काही दिवसांपासून राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दररोज चालण्याचा आणि धावण्याचा सराव करत आहेत. 

मुंबई : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा येत्या ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. या यात्रेत राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. मात्र, या नेत्यांसमोर सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे तो राहुल गांधींबरोबर दररोज एवढे चालायचे कसे? राहुल गांधी दररोज  सकाळी लवकर यात्रेची सुरुवात करतात आणि दिवसाला २५ किलोमीटर चालतात. त्यांच्याबरोबर एवढे चालायचे तर त्यासाठी चालण्याचा सराव हवा आणि फिटनेसही हवा. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दररोज चालण्याचा आणि धावण्याचा सराव करत आहेत. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या नेत्यांसह काँग्रेसचे आमदार, पदाधिकारी आणि इतर नेतेही सध्या दररोज काही किलोमीटर चालण्याचा सराव करण्यात व्यग्र आहेत. याशिवाय या यात्रेची तयारी आणि नियोजन करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असल्याने ही दुहेरी कसरत त्यांना करावी लागत आहे.

७ नोव्हेंबर रोजी ‘भारत जोडो’ राज्यात

७ नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यात प्रवेश करत आहे. त्यामुळे सुरुवातीला अशोक चव्हाण या यात्रेत राहुल गांधी यांच्याबरोबर चालणार आहेत. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून बाळासाहेब थोरात हेही राहुल गांधींबरोबर यात्रेत चालणार आहेत. भारत जोडो यात्रा ७ ते २० नोव्हेंबर अशी १४ दिवस महाराष्ट्रातून जाणार आहे. त्यामुळे हे १४ दिवस राज्यातील काँग्रेस नेत्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

टॅग्स :राहुल गांधीकाँग्रेसमहाराष्ट्र