Join us

उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होणार? काँग्रेस नेते पोहोचले 'मातोश्री'वर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 5:25 PM

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

मुंबई-

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. कारण काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ नुकतंच उद्धव ठाकरे यांना राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यासाठी 'मातोश्री'वर पोहोचले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, एच के पाटील आणि अशोक चव्हाण हे उद्धव ठाकरे यांना 'भारत जोडो' यात्रेचं निमंत्रण देण्यासाठी 'मातोश्री'वर दाखल झाले आहेत.

राहुल गांधी 'भारत जोडो' यात्रेचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले आहेत. पुढच्या महिन्यात 'भारत जोडो' यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे देखील 'भारत जोडो' यात्रा महाराष्ट्रात दाखल होताना स्वागतासाठी उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचं शिष्टमंडळ आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत काँग्रेसकडून शरद पवार यांना भारत जोडो यात्रेचं निमंत्रण दिलं जाणार आहे. 

राहुल गांधी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 'भारत जोडो यात्रा' सुरू केली. सध्या ही यात्रा कर्नाटकात आहे. यात्रेचा समारोप पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला काश्मीरमध्ये होणार आहे. या प्रवासात एकूण ३५७० किलोमीटरचे अंतर कापले जाणार आहे. पक्षाने राहुल यांच्यासह पक्षाच्या ११९ नेत्यांना 'भारत यात्री' असे नाव दिले आहे, जे पदयात्रा काढत काश्मीरला पोहोचणार आहेत.

टॅग्स :राहुल गांधीउद्धव ठाकरे