काँग्रेस नेत्यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 05:54 AM2018-09-21T05:54:48+5:302018-09-21T05:54:50+5:30
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील संभाव्य आघाडीसाठी गुरुवारी काँग्रेस नेत्यांनी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील संभाव्य आघाडीसाठी गुरुवारी काँग्रेस नेत्यांनी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे यांनी आंबेडकर यांच्या दादर येथील ‘राजगृह’ या निवासस्थानी भेट घेत आघाडीबाबत चर्चा केली.
आंबेडकर यांनी काँग्रेससोबत आघाडी शक्य असल्याचे गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. त्यानंतर या दोन नेत्यांनी त्यांची भेट घेत चर्चा केली. एमआयएमसोबतची भारिपची आघाडी, आंबेडकरांचे राष्ट्रवादीबाबतचे आक्षेप आदींवर चर्चा झाली. जागावाटप अपेक्षा, रणनीतीवरही प्राथमिक स्तरावर चर्चा झाली. भाजपाविरोधात समविचारी पक्षांची आघाडी करण्यास काँग्रेस उत्सुक आहे. त्यादृष्टीने सकारात्मक चर्चेची तयारी असल्याचेही काँग्रेस नेत्यांनी बैठकीत स्पष्ट केले.