मुंबई- मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता राधाकृष्ण मंगल कार्यालय, गारखेडा, औरंगाबाद येथे बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वरिष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आदी नेते यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते तर मराठवाड्यातील सर्व खासदार, आमदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व इतर प्रमुख नेते देखील उपस्थित राहतील.या बैठकीमध्ये संबंधित जिल्ह्यांमधील नेत्यांकडून दुष्काळी परिस्थितीची माहिती घेऊन त्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांची चर्चा केली जाईल. यापूर्वी शेतकऱ्यांवर आलेल्या विविध संकटांच्या वेळी भाजप-शिवसेना सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीचाही यावेळी आढावा घेतला जाणार आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असतानाही तातडीने दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार उदासीन असल्याचे दिसून येते. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार दिरंगाई करीत असल्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी दौरा करण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा केली जाईल.
काँग्रेस नेते घेणार दुष्काळी परिस्थितीचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 8:50 PM