Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून मोठी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर आता शिंदे गट आणि भाजप मिळून राज्यात होमाऱ्या आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे. मात्र, यातच मुंबईतील एका पोटनिवडणुकीत शिवसेनाविरुद्ध भाजप-शिंदे गट आणि काँग्रेस अशी लढत पाहायला मिळू शकते. कारण, महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक न लढता काँग्रेस आपला वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या (Andheri East Bypoll) जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी शिंदे गटाने दावा सांगितला होता. मात्र भाजपने ही जागा हिसकावल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरु आहेत. यानंतर आता काँग्रेसनेही आपला उमेदवार देण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे.
रमेश लटकेंच्या पत्नीच्या उमेदवारीवरून काँग्रेस नाराज
रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी गेल्याच आठवड्यात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ऋतुजा लटके यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ऋतुजा लटके यांच्यासाठी दारोदार प्रचार सुरु झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे, रमेश लटकेंच्या पत्नीला उमेदवारी देण्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी महाविकास आघाडीतील घटकपक्षांसोबत चर्चा न केल्यामुळे मुंबई काँग्रेस नाराज असल्याचे सांगितले जात आहे. आम्ही यापूर्वीसुद्धा ही जागा लढवलेली असल्यामुळे उमेदवार उतरवू शकतो किंवा शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतो, याबाबत पक्षांतर्गत चर्चेनंतर निर्णय होईल, असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे.
दरम्यान, भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. मुरजी पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. अंधेरी भागात त्यांनी जीवनज्योत प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले आहे. मुरजी पटेल यांच्या पत्नी केशरबेन २०१२ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेविका होत्या. २०१५ मध्ये पटेल दाम्पत्याने काँग्रेस सोडून भाजपचा झेंडा हाती धरला. त्यानंतर २०१७ ची महापालिका निवडणूक जिंकली, मात्र २०१८ मध्ये बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात दोघांचंही नगरसेवक पद रद्द झाले होते.