Congress ( Marathi News ) : मुंबई- काँग्रेसला धक्का देत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, आज महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज राज्यातील दिग्गज नेत्यांची बैठक घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.
"डरपोक लोक पक्ष सोडत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होणार नाही, काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराने असे केल्यास त्याला सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात येईल. केंद्रीय यंत्रणांच्या दबावामुळे अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडला, मात्र त्यांच्या जाण्याने पक्ष अजिबात कमकुवत होणार नाही, कार्यकर्ते काँग्रेससोबत आहेत, असंही चेन्निथला यांनी सांगितले.
'इंडिया' आघाडी सत्तेत आल्यास 'MSPची हमी', लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींची मोठी घोषणा
रमेश चेन्निथला म्हणाले, काँग्रेस पक्ष पूर्णपणे एकसंध आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत इतर कोणतेही नेते पक्ष सोडणार नाहीत. ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भाजपने गंभीर आरोप केले होते त्यांच्यासाठी भाजपने दरवाजे उघडले आहेत, अजित पवारांचा ६० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, अशोक चव्हाणांचा आदर्श घोटाळा आदी प्रकरणांचा आता भाजपमध्ये ते क्लिन होणार आहेत. भाजप वॉशिंग मशिनप्रमाणे काम करत आहे, असा टोलाही चेन्निथला यांनी लगावला.
काँग्रेसने अशोक चव्हाण यांना सर्व दिले
अशोक चव्हाण वगळता कोणीही काँग्रेस सोडणार नसल्याचा दावा महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केला. सर्व एकजूट आहेत, अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने सर्वस्व दिले, त्यांना दोनदा मुख्यमंत्री केले, ते सीडब्ल्यूसीचे सदस्य होते तरीही ते निघून गेले असंही चेन्निथला म्हणाले. महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक पक्षाचे नेते उपस्थित होते.