मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत सोई सुविधांवर महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावरील खड्डे, दूषित पिण्याचे पाणी, रस्त्यावरील कचऱ्याची दयनीय अवस्था,नालेसफाई अशा विविध प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्याकरिता मुंबई काँग्रेसने आज पश्चिम उपनगरात विविध विभाग कार्यालयांवर धडक मोर्चे काढले.
के /पूर्व विभाग कार्यालयावर धडक मोर्चा माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज अंधेरी (पूर्व),गुंदवली येथील के /पूर्व विभाग कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी मुंबईच्या नागरी प्रश्नांवर के/पूर्व कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली.अंधेरी (पूर्व),जोगेश्वरी,विलेपार्ले या तीन विधानसभा क्षेत्राच्या वतीने कॉंग्रेसतर्फे सुरेश शेट्टी यांनी के/पूर्व कार्यालयाचे सहाय्यक अभियंता यांना निवेदन दिले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा, जिल्हा अध्यक्ष क्लाइव्ह डायस, माजी नगरसेवक जगदीश अमीन, माजी नगरसेविका विंनी डिसोझा, मुंबई सचिव संतोष बागवे व सर्व ब्लॉक अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
के/ पश्चिम मनपा कार्यालयावर धडक मोर्चा
माजी खासदार व काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज दुपारी अंधेरी पश्चिम येथील के/ पश्चिम मनपा कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत सोयी सुविधांवर बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आल्याची माहिती निरुपम यांनी दिली.
पी/ उत्तर कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा
रस्त्यांवर पडलेले खड्डे, अशुद्ध पाणी पुरवठा, विकास कामांमधील दिरंगाई अशा विविध विषयांवरुन पालिका प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी आज कॉंग्रेस मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या वतीने मनपा पी/ उत्तर विभाग कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध वक्त्यांनी आपल्या भाषणात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराचा पाढाच वाचला.
यावेळी प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सदस्य हैदरअली शेख, मुंबई कॉंग्रेसचे सचिव संतोष चिकणे,परमिंदर सिंग भामरा,अँड पंकज कपूर, गफूर कुरेशी, निर्मला शाह, संगीता ऍंथोनी, पूजा जवेरी, शरोन बरेतो, जकेरिया लकडावाला, महेश धावडे, विपुल शाह आदी पदाधिकाऱ्यांसह कॉंग्रेस कार्यकर्ते व नागरिक मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.