Nawab Malik: काँग्रेस मंत्री अस्लम शेख यांनाही क्रुझवर येण्यासाठी आग्रह; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 01:14 PM2021-11-07T13:14:31+5:302021-11-07T13:15:47+5:30
सेलिब्रेटींच्या मुलांना बोलावून त्यांना जाळ्यात अडकवण्याचा प्लॅनिंग होतं असा गौप्यस्फोट मलिकांनी केला.
मुंबई – आर्यन खानला क्रुझवर अपहरण करुन नेण्यात आले. आर्यनला त्याचा मित्र प्रतिक गाभा आणि आमिर फर्निचरवाला याने नेले होते. हा संपूर्ण खेळ मोहित कंबोजनं(Mohit Kamboj) रचला होता. मोहित कंबोजचा मेव्हणा ऋषभ सचदेव या प्रकरणात सहभागी होता. NCB नं ११ लोकांना ताब्यात घेतले परंतु त्यातल्या ३ जणांना सोडण्यात आले. समीर वानखेडे मोहित कंबोजचा जवळचा आहे. शाहरुख खानलाही धमकावलं जात आहे. जर तू काय बोलला तर मुलगा जेलमध्ये जाईल असा आरोप नवाब मलिक(Nawab Malik) यांनी केला आहे.
पालकमंत्री अस्लम शेख यांनाही आमंत्रण
नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट केला की, क्रुझवरील छापेमारीत नमस्के स्प्रे ब्रँडचा पेपर रोल सीझ करण्यात आला. हा फॅशन टीव्हीचा स्पॉन्सर ब्रँड आहे. या पेपरमधून ड्रग्स आणलं गेले सांगितले गेले. मग याच्या मालकाला अटक का केली नाही. देशातील अनेक पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हे नोंद झाले आहेत. दिल्ली जेलमध्ये तो बंद होता. ड्रग्स पेडलर आहे. क्रुझवर असताना त्याला अटक का केली नाही. इतकचं नाही तर आमच्या सरकारचे मंत्री अस्लम शेख यांनाही क्रुझवरील पार्टीचं निमंत्रण दिले गेले. परंतु ते गेले नाहीत. सेलिब्रेटींच्या मुलांना बोलावून त्यांना जाळ्यात अडकवण्याचा प्लॅनिंग होतं असा गौप्यस्फोट मलिकांनी केला. मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या मुलांनाही क्रुझवर नेण्यासाठी आग्रह करत होता. ड्रग्सचा खेळ सरकारकडून सुरु असल्याचा डाव रचला जात होता का? ते जर गेले असते तर उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न होता. अस्लम शेख(Aslam Shaikh) यांना खूप आग्रह करण्यात आला होता. तसेच ही लढाई राज्यविरुद्ध केंद्र सरकार नाही. NCB च्या चांडाळ चौकडीविरोधात लढाई आहे. त्यांना निलंबित करून चौकशी करावी. ड्रग्स धंदा बंद व्हावा परंतु या चांडाळ चौकडीमुळे ते बंद होत नाही असंही मलिक म्हणाले.
मोहित भारतीय आणि समीर वानखेडे यांची भेट
६ ऑक्टोबरला माझी पत्रकार परिषद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ७ तारखेला ओशिवरा कब्रस्तानच्या बाहेर समीर वानखेडे आणि मोहित भारतीय एकमेकांना भेटले. या भेटीनंतर वानखेडे घाबरलेले होते. त्यांनी पोलीस ठाण्यात कुणीतरी पाठलाग करत असल्याची तक्रार केली. या दोघांचे नशीब चांगले आहे. त्या भेटीच्या ठिकाणी लागलेले सीसीटीव्ही बंद होते अन्यथा ते फुटेज मिळाले असते. समीर वानखेडे हे मोठ्या सेलिब्रेटींकडून वसुली करायचे. NCB च्या या चांडाळ चौकडीला तात्काळ काढलं पाहिजे अशी मागणी मलिकांनी केली.
सुनील पाटीलचा NCP शी संबंध नाही
माझ्या आयुष्यात मी सुनील पाटीलला कधी भेटलो नाही. सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य नाही. सुनील पाटीलचे अमित शाहसोबत फोटो आहेत. गुजरातच्या मंत्र्यांसोबत फोटो आहेत. आम्ही फोटोवर आरोप लावत नाही. सुनील पाटील हादेखील समीर वानखेडेच्या प्रायव्हेट आर्मीचा खेळाडू आहे. मी ६ तारखेला पत्रकार परिषद घेतली त्यानंतर २ तासाने मला सुनील पाटीलचा फोन आला. मला आणखी काही माहिती द्यायची असल्याचं सांगितलं. तेव्हा मी त्याला मुंबईत यायला सांगितले परंतु तो आला नाही. त्याला पोलिसांसमोर येऊन सत्य सांगायला बोललो तेव्हा तो गुजरातमध्ये असल्याचं म्हणाला. अद्याप सुनील पाटील समोर आला नाही असंही नवाब मलिकांनी खुलासा केला. मोहित भारतीय यांनी नवाब मलिकांना सुनील पाटील कोण असा प्रश्न केला होता. त्यावर मलिकांनी स्पष्टीकरण दिले.