Join us

काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचे तळ्यात-मळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 1:31 AM

सेना की भाजप?

मनोहर कुंभेजकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकीकडे भाजप आणि शिवसेनेत मोठया प्रमाणात इनकमिंग सुरू असताना, मालाड पश्चिम विधानसभेचे गेली १० वर्षे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे आमदार शिवसेना की भाजपात जाणार? यावर राजकीय चर्चा रंगली असून, याबाबत ते सध्या तळ्यात मळ्यात आहेत.

‘अस्लम शेख शिवसेनेच्या वाटेवर?’ असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच राजकीय चर्चा रंगली होती. सध्या अस्लम शेख यांचे फोटो चक्क भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी तसेच शिवसेनेच्या बॅनरवर झळकू लागले आहेत. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी हे मालाड विधानसभेतील समस्यांची तसेच गणपती विसर्जनाच्या तयारीसाठी आकसा, मार्वे या भागात आले होते. त्यावेळी खासदार गोपाळ शेट्टी व अस्लम शेख हे दोघे ही पालिका आयुक्तांसमवेत होते. यावेळी अस्लम शेख भाजपात का शिवसेनेत प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू झाली.

मालाड पश्चिम विधानसभा मतदार संघ शिवसेनेने मागितला आहे. त्यामुळे युतीच्या वाटाघाटीत हा मतदार संघ कोणाला जातो यावर आपली पुढच्या प्रवेशाची रणनीती अस्लम शेख ठरवणार असल्याची शक्यता आहे. अस्लम शेख शिवसेनेत आल्यास उत्तर मुंबईतील पक्षाची ताकद वाढू शकते, अशी जोरदार चर्चा मालाड विधानसभा मतदार संघात आहे.आमदार अस्लम शेख यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही लोकांची कामे करतो. त्यामुळे पालिका आयुक्तांच्या भेटी दरम्यान मी व खासदार गोपाळ शेट्टी हे आयुक्तांना समस्या समजावून सांगण्यासाठी एकत्र होतो. मात्र शिवसेना का भाजपात आपण प्रवेश करणार का?यावर काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.