काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचे तळ्यात-मळ्यात, सेना की भाजपाच्या गळ्यात?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 09:14 PM2019-08-29T21:14:39+5:302019-08-29T21:15:39+5:30
आमदार अस्लम शेख हे 1997 ते 2002 समाजवादी पार्टी व 2002 ते 2007 या काळात ते काँगेसचे नगरसेवक होते.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : एकीकडे भाजपा आणि शिवसेनेत मोठया प्रमाणात इन्कमिंग सुरू असतांना, मालाड पश्चिम विधानसभेचे गेली 10 वर्षे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे आमदार शिवसेनेत का भाजपात जाणार हे युतीमध्ये कोणाला जागा भेटणार यावर ठरणार असून ते सध्या तळ्यात की मळ्यात आहे. दैनिक लोकमत ऑनलाईनवर 26 जुलै आणि 27 जुलैच्या अंकात अस्लम शेख शिवसेनेच्या वाटेवर? असे लोकमतने सर्वप्रथम दिलेले वृत्त प्रसिद्ध होताच लोकमतच्या बातम्या राजकीय वर्तुळासह राज्यात सर्वत्र व्हायरल झाल्या होत्या.
सध्या अस्लम शेख यांचे फोटो चक्क भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी तसेच शिवसेनेच्या बॅनरवर झळकू लागले आहेत. गुरूवारी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी हे मालाड विधानसभेतील समस्यांची तसेच गणपती विसर्जनाच्या तयारीसाठी आकसा, मार्वे याभागात आले होते. त्यावेळी खासदार गोपाळ शेट्टी व अस्लम शेख हे दोघे ही पालिका आयुक्तांसमवेत होते. आयुक्त व खासदार शेट्टी यांनी मार्वे ते आकसा असा 5 किमीचा सायकल चालवण्याचा मनमुराद आनंददेखिल लुटला होता. त्यामुळे अस्लम शेख भाजपात का शिवसेनेत प्रवेश करणार अशी परत एकदा पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध असून त्यांनी भाजपाच्या काही नेत्यांच्याही यापूर्वी भेटीगाठी घेतल्याचे समजते. मालाड पश्चिम विधानसभा मतदार संघ शिवसेनेने मागितला आहे, त्यामुळे युतीच्या वाटाघाटीत हा मतदार संघ कोणाला जातो यावर आपली पुढच्या प्रवेशाची रणनीती अस्लम शेख ठरवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आमदार अस्लम शेख हे 1997 ते 2002 समाजवादी पार्टी व 2002 ते 2007 या काळात ते काँगेसचे नगरसेवक होते. 2009, 2014 मध्ये ते मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. पी उत्तर वॉर्डमध्ये काँग्रेसचे 4 नगरसेवक आहेत. त्यातील वॉर्ड क्रमांक 32च्या नगरसेविका स्टेफी किणी यांचे नगरसेवकपद अवैध जातीच्या दाखल्यामुळे रद्द झाले आहे.
आमदार अस्लम शेख यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाबाबत चर्चेचे गुऱ्हाळ गेले काही दिवस मातोश्रीवर सुरू आहे. युवासेनाप्रमुख व शिवसेनानेते आदित्य ठाकरे हे मागील जुलै महिन्यात मालाड पश्चिम चिंचोली बंदर शाळेच्या कार्यक्रमाला काही दिवसांपूर्वीच आले होते. त्यावेळी मालाड विधानसभेतील शिवसैनिकांनी आमदार अस्लम शेख यांच्या शिवसेनेतील प्रवेशाबाबत त्यांना विचारले असता, हा येथे चर्चेचा विषय नाही असे मार्मिक उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिल होते. तर यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जो उमेदवार देतील तो आम्ही निवडून आणू असे उत्तर यावेळी गटप्रमुखांनी दिल्याचे समजते.
2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपा युती शेवटच्या क्षणाला तुटली होती. यावेळी आमदार अस्लम शेख यांनी भाजपाचे उमेदवार व माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचा 2200 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे आता 2019च्या विधानसभा निवडणुकीत युतीत ही जागा शिवसेनेला हवी आहे. अस्लम शेख शिवसेनेत आल्यास उत्तर मुंबईतील पक्षाची ताकद वाढू शकते अशी जोरदार चर्चा मालाड विधानसभा मतदार संघात आहे. यावर आमदार अस्लम शेख यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही लोकांची कामे करतो त्यामुळे पालिका आयुक्तांच्या भेटी दरम्यान मी व खासदार गोपाळ शेट्टी हे दोघे आयुक्तांना समस्या समजावून सांगण्यासाठी एकत्र होतो. मात्र, शिवसेना का भाजपात आपण प्रवेश करणार का?यावर काही अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.