- मनोहर कुंभेजकरमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी काल त्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. आता मालाड पश्चिमचे काँग्रेस आमदार अस्लम शेख शिवसेनेच्या वाटेवर असून ते लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. तसे झाल्यास मालाड पश्चिम विधानसभेतून ते शिवसेनेचे उमेदवार असतील अशीदेखील जोरदार चर्चा आहे.
आमदार अस्लम शेख हे 1999 ते 2004 समाजवादी पार्टी व 2004 ते 2009 या काळात काँगेसचे नगरसेवक होते. २००९, २०१४ मध्ये ते मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. पी उत्तर वॉर्डमध्ये काँग्रेसचे 4 नगरसेवक आहेत. त्यातील वॉर्ड क्रमांक 32च्या नगरसेविका स्टेफी किणी यांचे नगरसेवकपद अवैध जातीच्या दाखल्यामुळे रद्द झाले आहे.
अस्लम शेख गेल्या चार दिवसांपासून त्यांच्या नार्वे रोडवरील कार्यालयात फिरकलेच नसल्याची माहिती सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध असून त्यांनी भाजपाच्या काही नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्याचे समजते. आमदार शेख यांचे कार्यकर्तेसुद्धा त्यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहितीदेखील सूत्रांनी लोकमतला दिली.
आमदार अस्लम शेख यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाबाबत चर्चेचे गुऱ्हाळ गेले काही दिवस मातोश्रीवर सुरू आहे. युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे मालाड पश्चिम चिंचोली बंदर शाळेच्या कार्यक्रमाला काही दिवसांपूर्वीच आले होते. त्यावेळी मालाड विधानसभेतील शिवसैनिकांनी आमदार अस्लम शेख यांच्या शिवसेनेतील प्रवेशाबाबत त्यांना विचारले असता, हा येथे चर्चेचा विषय नाही असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिल्याचे समजते.
2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपा युती शेवटच्या क्षणाला तुटली होती. यावेळी आमदार अस्लम शेख यांनी भाजपाचे उमेदवार व माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचा 2200 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे आता 2019च्या विधानसभा निवडणुकीत युतीत ही जागा शिवसेनेला हवी आहे. अस्लम शेख शिवसेनेत आल्यास उत्तर मुंबईतील पक्षाची ताकद वाढू शकते. याबाबत आमदार अस्लम शेख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.