मुंबई - मागील काही दिवसांपासून सोशल मिडीयावर अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या भाषणाची खिल्ली उडताना पाहायला मिळतेय, पार्थ पवारवर टीका करणाऱ्या नेटीझन्सचा नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला.
"पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणवार खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. पहिले भाषण आणि मोठी गर्दी.. धाडस लागते! लंबे रेस का घोडा है.. याद रखना!!" असं ट्वीट नितेश राणेंनी केलं आहे. नितेश राणेंनी पार्थ पवार यांच्या समर्थनार्थ केलेल्या या ट्विटमुळे काही राजकीय गणिते जुळवण्याचा प्रयत्न आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून माजी खासदार निलेश राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. निलेश राणेंना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळावा यासाठी राजकीय हालचालीदेखील सुरु आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीकडून माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यातील चिंचवडमध्ये रविवारी 17 मार्चला पार्थ पवार यांच्या प्रचारसभेचा नारळ फोडण्यात आला. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी पहिल्यांदाच पार्थ पवारांनी जाहीर सभेत राजकीय भाषण केलं. मात्र पहिल्यांदा भाषण करताना पार्थ पवार काहीसे भांबावल्यासारखे दिसले. अवघ्या तीन मिनिटांच्या भाषणात पार्थ पवार बरेच गोंधळलेले दिसले. अनेक वेळा ते गडबडलेही.
कागदावर लिहून आणलेले भाषण पार्थ पवार यांनी वाचून दाखविले मात्र भाषणात अनेकवेळा ते गोंधळून गेले त्याची चर्चा सोशल मिडीयात होऊ लागली. पार्थ पवार यांनी भाषणाची सुरुवात करतानाच माझं हे पहिलं भाषण आहे, काही चूकभूल झाली तर माफ करा, अशी आर्जवही केली.
या मेळाव्यातील अडखळ्लेल्या भाषणात पार्थ म्हणाले, राजकारणात जरी नवीन असलो तरी तुम्ही विश्वास दाखवा तो मी सार्थ करुन दाखवेन..तसेच या मतदार संघाला बारामती व पिपंरी चिंचवडसारखे विकसित करेन.पार्थ पवार यांच्या भाषणाच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे काही काळ त्यांचा गोंधळ उडाला.त्यानंतर कागदावर लिहून आणलेले भाषण वाचून दाखविले.या तीन मिनिटांच्या भाषणात त्यांनी सत्ताधारी भाजपा सरकारवर बेरोजगारी , भ्रष्टाचार, यांसारख्या मुद्द्यांवरून टीका केली. पण मावळ लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर यांनी भर दिला नसल्याचे दिसून आले. तरीही उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या.