मुंबई : मुंबई-अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पुढाकार घेतला, तर त्याविरुद्ध काँग्रेस पक्ष आंदोलन करेल, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी सांगितले. त्यामुळे बुलेट ट्रेनवरून भाजपा विरुद्ध काँग्रेस असा वाद उभा राहणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बुलेट ट्रेन आणायचीच असेल तर ती मुंबई-पुणे-औरंगाबाद-नागपूर अशी केली पाहिजे. हा प्रकल्प सुरुवातीला काहीसा व्यवहार्य वाटणार नाही़ पण त्याची उपयुक्तता सिद्ध होऊ लागताच व्यवहार्यतादेखील सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काहीही फायदा होणार नाही. गुजरातला मोठा लाभ होईल. मुंबईतील व्यापार अहमदाबाद व पर्यायाने गुजरातमध्ये पळवून नेण्याचा डाव तर या मागे नाही ना, अशी शंका येत असल्याचे चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नागरी सेवेचे स्वतंत्र केडर निर्माण करावेमहाराष्ट्रासह अनेक राज्यांचे नागरीकरण झपाट्याने होत आहे. अशावेळी जिल्हाधिकारी वा जिल्हा परिषदेचे सीईओ हेच शहर विकासासाठीच्या विविध शासकीय संस्था वा प्राधिकरणांवर नेमण्यात आले, तर त्यांना नागरी समस्यांचा तेवढा अभ्यास आणि अनुभव नसल्याने अडचणी येतात. म्हणून केंद्र सरकारने नागरी प्रशासनासाठी आयएएस अधिकाऱ्यांचे स्वतंत्र केडर निर्माण करावे, अशी सूचना चव्हाण यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)महामंडळांचे अध्यक्षपदमंत्र्यांकडे नसावेमहामंडळे आणि प्राधिकरणांचे अध्यक्षपद मंत्री वा मुख्यमंत्र्यांंना देऊ नये, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की यावर चर्चा झाली पाहिजे, असे मला वाटते. महामंडळांचे अध्यक्ष मंत्र्यांना केले तर ते कोणाला उत्तरदायी नसतात. त्यामुळे बरेचदा अपारदर्शक निर्णय होतात. आयएएस अधिकारी अध्यक्ष असतील तर ते उत्तरदायी असतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. एमएमआरडीए, एमआयडीसी, एसआरए, एमटीडीसी आदी महामंडळे आणि प्राधिकरणांचे अध्यक्षपद मुख्यमंत्री वा मंत्र्यांकडे असते.
बुलेट ट्रेनविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन
By admin | Published: April 12, 2015 2:11 AM