नवी दिल्ली/ मुंबई: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने ४-१ अशी खणखणीत बाजी मारली. पंजाबात मात्र आम आदमी पक्षाची अक्षरश: त्सुनामी आली. त्यात काँग्रेस, भाजप आणि अकाली दल हे सर्व पक्ष वाहून गेले. उत्तर प्रदेशात एखाद्या पक्षाने सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्याची किमया तब्बल ३७ वर्षांनी साधली आहे.
पाच राज्यांचा निकाल हाती लागल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची चर्चा सुरु झाली आहे. भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील पाच राज्यांच्या निवडणूकीनंतर महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येईल, असा दावा केली होता. याचदरम्यान, महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकतं, असं विधान काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी केलं आहे.
महाविकास आघाडी सरकार ज्या क्षणापासून स्थापन झाले आहे त्या क्षणापासूनच महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकतं, अशी भीती माझ्या मनात आहे. भाजपा हा अत्यंत साधनशूचिता असणारा पक्ष आहे. कर्नाटकमध्ये काय झालं, मध्यप्रदेशात काय झालं हे पाहिलं की लक्षात येतं, असं कुमार केतकर यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे पाच राज्यांचे निकालांच महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्की परिणाम होतील. सरकार पाडण्यासाठी भाजपा जोमाने प्रयत्न करणार, असा दावा देखील कुमार केतकर यांनी केली आहे.
दरम्यान, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यावर होणारी टीका पाहता त्यांचे समर्थक समर्थनासाठी पुढे आले आहेत. ग्रुप-२३चा कोणताही नेता हल्लाबोल करण्यापूर्वीच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीची बैठक बोलाविण्याची घोषणा केली आहे. त्या बैठकीत राहुल यांच्याबाबतची नाराजी निघून जावी, असा त्या मागील उद्देश आहे.
काँग्रेसचे मोठे नेते हल्लाबोल करण्याच्या तयारीत-
काँग्रेसचे अनेक मोठे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत. याच साखळीत सर्वांत पहिला हल्ला पक्षाचे खा. अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. ते म्हणाले की, काँग्रेस एकापाठोपाठ एक निवडणुका हारत चालली आहे. परंतु २०१४ नंतर झालेल्या पराभवांपासून आम्ही कोणताही धडा शिकलेलो नाहीत.
पक्षाला आत्मचिंतन करण्याबरोबरच संपूर्ण पक्षात नवीन बदल करण्याची गरज आहे. सिंघवी यांनी राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख राहुल गांधी यांच्या नेतृत्वाकडेच होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ राहिलेले ए. के. अँटोनी यांनी तर दुखी होऊन कोणताही हल्लाबोल केल्याशिवाय सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजकारणातून संन्यास घेतला.