"आता तुम्हाला आमचा विरोध दिसेल"; धारावी प्रकल्पाच्या भूमिपूजनावरुन वर्षा गायकवाडांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 01:42 PM2024-09-13T13:42:07+5:302024-09-13T13:50:11+5:30

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजनावरुन काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी जोरदार टीका केली आहे.

Congress MP Varsha Gaikwad has strongly criticized the Bhoomi Pujan of Dharavi Redevelopment Project | "आता तुम्हाला आमचा विरोध दिसेल"; धारावी प्रकल्पाच्या भूमिपूजनावरुन वर्षा गायकवाडांचा इशारा

"आता तुम्हाला आमचा विरोध दिसेल"; धारावी प्रकल्पाच्या भूमिपूजनावरुन वर्षा गायकवाडांचा इशारा

Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन सध्या मोठा वाद सुरु झाला आहे. महाविकास आघाडीने या प्रकल्पाला जाहीर विरोध केला आहे. अदानी समूहाकडे या पुनर्विकास प्रकल्पाचे काम देण्यास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नकार दिला आहे. असं असतानाही  धारावीच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा उरकण्यात आला.  माटुंगा येथील आरपीएफ मैदानावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमीपूजन गुरुवारी करण्यात आले. या भूमिपूजनावरुन आता काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी जोरदार टीका केली आहे. विरोधाला घाबरुन अदानींकडून गुपचूप भूमिपूजन केल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन सुरु असलेल्या राड्यावरुन गोंधळ टाळण्यासाठी कोणताही गाजावाजा या कामाचे भूमिपूजन करण्यात आलं. माटुंग्यातील सेक्टर ६ येथे रेल्वे कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आणि कार्यालयांच्या बांधकामाला सुरुवात करत हा भूमिपूजन सोहळा करण्यात आला. महाराष्ट्र सरकार व अदानी समूहाची संयुक्त कंपनी असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पहाटे चार ते सात वाजण्याच्या दरम्यान माटुंग्याच्या आरपीएफ मैदानावर हा भूमिपूजन सोहळा पार पडला.

"या भूमिपूजन सोहळ्यावरुन धारावीच्या माजी आमदार आणि नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी टीकास्त्र डागलं आहे. भूमिपूजनाचा नारळ फोडण्याचे काम घाईघाईने आणि छुप्या पद्धतीने झालं. कोट्यवधि रुपयांच्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा नारळ फोडताना एवढं घाबरण्याचे कारण काय होतं? यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असून यांच्याकडून जमिनी घेण्याचे काम चालू आहे त्याच्याविरोधात आम्ही आवाज उठवत आहोत. म्हणून घाबरुन त्यांनी भूमिपूजन केलं. आमचा त्याला विरोध आहे. लोकांना बरोबर न घेता कुठला विकास होऊ शकतो का?," असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला.

"या कार्यक्रमाचे कोणालाच निमंत्रण नव्हते. एका खोलीत भूमिपूजन करण्यात आलं.  पंतप्रधान मोदींचे मित्र आहेत म्हणून त्यांना मोक्याच्या जागा दिल्या जात आहेत. मुख्यमंत्री सांगतात मिठागरांच्या जागांवर कोणतेही बांधकाम होत नाही. पण तिथेच इमारत बांधता येऊ शकते का? हे काम होणार नाही. आमचा विरोध आता तुम्हाला दिसेल," असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला.

दरम्यान, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन याआधी ७ सप्टेंबर रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र धारावी बचाव आंदोलन समिनीते आंदोलनाचा इशारा देताच हा कार्यक्रम रद्द करून तो १२ सप्टेंबर रोजी करण्याचे ठरले. हा भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा धारावी बचाव आंदोलकांनी दिला होता. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर गुरुवारी अचानक माटुंगा येथे  या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडल्याचे जाहीर करण्यात आलं.

Web Title: Congress MP Varsha Gaikwad has strongly criticized the Bhoomi Pujan of Dharavi Redevelopment Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.