Join us

“भाजपाकडे नेतृत्व नसल्याने आयारामांना राज्यसभा उमेदवारी, निष्ठावंत वंचितच”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 5:27 PM

Congress Vs BJP: राज्यसभा उमेदवारी आयारामांना देऊन कार्यकर्त्यांनी सतरंज्याच उचलाव्या हा संदेश भाजपाने दिला. हेच Party With Difference आहे का? असा सवाल नाना पटोलेंनी केला.

Congress Vs BJP: भाजपाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि ओडिसा येथून आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केलेले अशोक चव्हाण, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेकांची वर्णी लागलेली आहे. यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका केली असून, आयारामांना राज्यसभेची उमेदवारी दिली असून, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच राहिले, असा खोचक टोला लगावण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना भाजपावर निशाणा साधला. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला आयात केलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी लागली. जगातील सर्वात मोठा पक्ष व ‘विश्वगुरु’ असे नेतृत्व असल्याच्या वल्गणा करणाऱ्यांकडे राज्यसभेसाठी उमेदवार नसावा यातूनच भाजपा हा हवा भरलेला फुगा आहे तो कधीही फुटू शकतो हे दिसते. आयारामांना उमेदवारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे हीच भाजपाची पद्धत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलाव्या हा संदेश भाजपाने दिला

राज्यसभेची उमेदवारी आयात केलेल्या लोकांना देऊन कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलाव्या हा संदेश भाजपाने दिलेला आहे. पक्ष वाढवण्यासाठी जे कार्यकर्ते आयुष्यभर मेहनत करतात त्यांना भाजपा संधी देत नाही. भिती दाखवून, दरोडे टाकून दुसऱ्या पक्षातील लोकांना भाजपात घेणे, दुसऱ्यांचे पक्ष फोडणे, चोरणे हेच काम भाजपा करत आहे. भाजपामध्ये नेतेच नाहीत. ज्यांना ते ‘डिलर’ म्हणत होते त्यांनाच आता ‘लिडर’ म्हणण्याची वेळ भाजपावर आली आहे. पंतप्रधानांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना पक्षात घेऊन राज्यसभेची उमेदवारीही दिली हेच भाजपाचे Party with difference आहे का? भाजपाचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. हंडोरे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, संघटना बांधणीत त्यांचे मोठे योगदान आहे, तसेच त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. काँग्रेस पक्षाने हंडोरे यांनी उमेदवार देऊन कार्यकर्त्यांचा सन्मान केला आहे. चंद्रकांत हंडोरे यांचा विजय नक्की आहे, दगाफटका करण्यास काहीही वाव नाही, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :काँग्रेसनाना पटोलेनाना पटोलेराज्यसभानिवडणूकभाजपा