Join us

“राज्यात काय देशातही भाजप आता सत्तेत येणार नाही”; नाना पटोलेंचे संजय राऊतांच्या विधानाला समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 4:48 PM

भाजपने कितीही दिवास्वप्न पाहिले तरी ते पूर्ण होणार नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता काही झाले तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा केला होता. याला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी समर्थन दिले असून, राज्यात सोडा, देशातही भाजपची सत्ता येणार नसल्याचा दावा केला आहे. 

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. राज्यातील जनतेला महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे. आम्ही जनतेच्या कौलचा आदर केला आहे. आम्ही स्वतंत्र लढलो होतो. त्यामुळे कार्यकर्त्यांना जर त्या पद्धतीने सूचना केल्या तर स्थानिक कार्यकर्ते एकत्र बसून निर्णय घेतील, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते कामाला लागलेत

नगराध्यक्ष निवडणुकीवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपने कितीही दिवास्वप्न पाहिले तरी ते पूर्ण होणार नाही. भाजपला रोखण्यासाठीच महाविकास आघाडी तयार करण्यात आली होती. आता नगरपंचायत निवडणुका झाल्या. ज्यांची संख्या जास्त असेल त्यांचा नगराध्यक्ष बसवायचा असा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. ते टीव्ही९शी बोलत होते. 

काय म्हणाले होते संजय राऊत?

भाजपने स्वत:च अंधाऱ्या विहिरीत उडी मारली आहे. निराश मनाने राजकारण करतात त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच असते. यामुळेच काहीही झाले तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही. २०२४ मध्ये निवडणूक होईल, त्यात दिल्लीतील चित्र बदलून जाईल. भाजपने आता महाराष्ट्रालाही विसरुन जावे. त्यांचे ७५-१०० उमेदवार जिंकतीलही, पण, भविष्यात महाविकास आघाडी सत्तेत असेल. पुढचे २५ ते ३० वर्षे तरी त्यांची सत्ता येणार नाही. तोपर्यंत भाजप राहील की नाही माहीत नाही, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.  

टॅग्स :राजकारणनाना पटोलेकाँग्रेसभाजपा