Join us

“स्वत:वरील कलंक पुसण्याचा भाजपाचा प्रयत्न”; काँग्रेसचे नाना पटोले विधानसभेत आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 1:26 PM

सत्ता गेल्याचा हताशपणा भाजपमध्ये दिसत असून, तेच घोटाळेबाज आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

मुंबई: आताच्या घडीला राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session Maharashtra 2021) सुरू असून, अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, सभागृहात नेत्यांमध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. यातच काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा लावून धरला आहे. स्वत:वरील कलंक पुसण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याची टीकाही नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. 

गेल्या ९ महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिकामी आहे. राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तो मंजूर झाला की, लगेचच प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती देत जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही, तोपर्यंत नाव कळणार नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. त्यानंतर उमेदवारांची नावे कळतील, असेही ते म्हणाले. तर, २८ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

विधानसभा आपला राग काढण्यासाठी नाही

विधिमंडळाच्या कामकाजाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी भाजप करत आहे. मात्र, स्वतःवरील कलंक पुसण्याचा  प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. विधानसभा आपला राग काढण्यासाठी नाही. सत्ता गेल्याचा हताशपणा भाजपमध्ये दिसला. याशिवाय महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला अडचणीत आणू, हा भाजपचा फुसका बार निघाला. भाजप स्वतः घोटाळेबाज आहे. त्यामुळेच त्यांना सगळीकडे घोटाळे दिसत आहे, अशी घणाघाती टीकाही नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केली. 

दरम्यान, विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. आता हे पद कुणाला द्यायचे, याची निश्चिती होत नसल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली होती. मात्र, या पदासाठी काँग्रेसमधून चार नावे पुढे आल्याचे सांगितले जात आहे. भोरचे आमदार संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याचे म्हटले जात आहे.  

टॅग्स :विधानसभा हिवाळी अधिवेशनकाँग्रेसनाना पटोलेभाजपाराजकारण