Join us

“शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेचा अहंकार”; वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 5:11 PM

Congress Nana Patole News: महाराष्ट्र सुरक्षित राहिला नाही, हा संदेश देशात जात असून ते राज्याच्या हिताचे नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Congress Nana Patole News: पुण्यातील पोर्शे कार अपघाताची दाहकता कायम असतानाच आता मुंबईतील वरळीत एक भीषण घटना घडली आहे. भरधाव बीएमडब्ल्यू कारने एका दुचाकीस्वार जोडप्याला धडक दिली असून या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त बीएमडब्ल्यू कारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह होता. अपघाताच्या घटनेनंतर मिहीर शहा फरार झाला. यावरून विरोधकांनी महायुती सरकार आणि शिवसेना शिंदे गटासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना वरळी हिट अँड रन प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. पोलिसांचा धाकच नसल्याने गुन्हेगार मोकाट आहेत. पुण्यातील पोर्श अपघातातून सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. वरळीत एका महिलेला भरधाव गाडीने चिरडले. ही कार शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची आहे. दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवल्याने एका निरपराध महिलेचा मृत्यू झाला. शिंदे फडणवीस सरकारला सत्तेचा अहंकार आला आहे, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.

सरकारला जाग आली नसेल तर जनताच आता त्यांना घरी पाठवेल

मुख्यमंत्री म्हणतात कोणालाही पाठीशी घालणार नाही पण त्यांना कशाचेही गांभीर्य नाही. महाराष्ट्र सुरक्षित राहिला नाही हा संदेश देशात जात असून ते राज्याच्या हिताचे नाही. राज्यात अधिकारीही सुरक्षित राहिले नाहीत. पुण्यात वाहतूक शाखेच्या महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार घडला, महाराष्ट्र गुंडाराज व माफिया राज करुन ठेवले आहे. सरकारचा प्रशासनातील हस्तक्षेप, पैसे घेऊन बदल्या करणे अशा प्रकारांमुळे प्रशासन काम करत नाही त्याचे परिणाम जनेतेला भोगावे लागत आहेत. सरकारला जाग आली नसेल तर जनताच आता त्यांना घरी पाठवेल, असेही नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये ‘हिट अँड रन’ च्या घटनांमध्ये कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काही धनदांडगे,  राजकारणी लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून व्यवस्था वाकविण्याचा प्रयत्न करत असतील तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. सर्वसामान्य नागरिक हे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ‘हिट अँड रन’ सारखी प्रकरणे अत्यंत गांभीर्याने हाताळावीत आणि पीडितांना न्याय द्यावा. या प्रकरणांमध्ये दोषी कुणीही असो, मग तो कितीही श्रीमंत, प्रभावशाली, किंवा नोकरशहा, लोकप्रतिनिधींची मुले तसेच कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी व आमचे शासन पीडित आणि त्यांच्या कुटुंबिंयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व जनतेसाठी, सुरक्षित महाराष्ट्रासाठी आम्ही कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

टॅग्स :काँग्रेसनाना पटोलेनाना पटोलेड्रंक अँड ड्राइव्हवरळी