Join us

Maharashtra Politics: “शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम, तातडीने मदत जाहीर करा”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 2:47 PM

Maharashtra News: अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात असताना सरकारकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

Maharashtra Politics: राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. कांदा, कापूस, धान, सोयाबीन, हरभरा, तुरीसह शेतमालाला भाव नाही त्यातच अवकाळीने झोडपल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची राखरांगोळी झाली आहे, त्यामुळे सर्व कामकाज बंद करून शेतकऱ्यांबद्दल सरकराची भूमिका काय आहे हे कळले पाहिजे, संकटातील शेतकऱ्यांला सरकारने तातडीने मदत जाहीर केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस  कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरु होताच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी यासाठी विरोधकांनी स्थगन प्रस्ताव दाखल केला होता पण सरकारने तो फेटाळला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले व त्यांनी सभात्याग केला. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, अवकाळी पावासाने शेतातील उभी पिके खराब झाली, गहू, हरभरा, फळबागा, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची भयावह परिस्थिती असताना यापेक्षा दुसरा कोणता महत्वाचा विषय आहे. सर्व प्रश्न बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे अशी विरोधकांची मागणी होती पण सरकारने त्यावर समाधानकारक उत्तर दिले नाही. माहिती घेऊन नंतर भूमिका मांडू अशी सरकारची मोघम भूमिका होती. दोन दिवसाच्या अवकाळी पावसाने शेतातील पीक जमीनदोस्त होत असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, त्यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री धुळवड खेळण्यात मग्न होते, अशी टीका नाना पटोलेंनी केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण होऊ नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण होऊ नये हीच विरोधकांची मागणी आहे. पण मागील आठवड्यातही कांदा, सोयाबीन, कापसचा प्रश्न उपस्थित केला होता. नाफेड कांदा खरेदी करत असल्याचे सरकारने सभागृहात सांगितले, पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. कांदा खरेदी होत नाही. वीज कनेक्शन कापणार नाही असे सांगितले होते पण विदर्भ विभागातच ९९९५ शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले आहे. सरकार सभागृहात एक सांगते पण वस्तुस्थिती वेगळी आहे. म्हणून विरोधकांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता पण सरकारने स्थगन प्रस्ताव नाकारला. शेतकऱ्यांचा रंग बेरंग झाला असताना सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, या शब्दांत नाना पटोलेंनी घणाघात केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :नाना पटोलेकाँग्रेस