Join us

“मराठा-ओबीसी आरक्षणप्रश्नी सरकारमधील मंत्र्यांचा वाद हा ठरवून केलेला कार्यक्रम”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 4:51 PM

Congress Nana Patole News: पाच राज्यात काँग्रेसच विजयी होणार असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

Congress Nana Patole News: राज्यात मागील काही महिन्यांपासून आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजपनेच आरक्षणाचे आश्वासन दिले होते पण आता ते आरक्षण देण्यास चालढकल करत आहेत. आरक्षण प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाजात जाणीवपूर्वक भांडणे लावली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम भाजपा करत आहे. आरक्षण प्रश्नावरून मंत्रिमंडळातील मंत्र्यांची भांडणे ही सरकारचा ठरवून सुरु असलेला कार्यक्रम आहे. ही सर्व नौटकी सुरु असून राज्यातील जनतेला हे माहित आहे. सर्व जातींना आरक्षण मिळाले पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे, त्यासाठी जातनिहाय जनगणना केली पाहिजे पण भाजपा सरकार ही जनगणना करत नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात १.२५ लाख शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत पण सरकार त्या जागांची भरती करत नाही. भाजपा सरकार जिल्हा परिषदांच्या शाळा बंद करत आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या नावाने आदर्श शाळा उपक्रमाची घोषणा करत आहे, हा सर्व हास्यास्पद प्रकार आहे. शाळेत शिक्षकच नाहीत तर आदर्श शाळा कसली? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

पाच राज्यात काँग्रेसच विजयी होणार

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना व मिझोराम या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून काँग्रेस पक्षाला या पाचही राज्यात जनतेचे मोठे समर्थन लाभले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, खासदार राहुल गांधी व प्रियंकाजी गांधी यांनी या राज्यात झंझावाती प्रचार केला. पाचही राज्यातील वातावरण काँग्रेस पक्षासाठी अनुकुल आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष या पाचही राज्यात बहुतमाने निवडून येईल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :काँग्रेसनाना पटोलेनाना पटोले