Congress Nana Patole News: राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. यात महिला, युवक, शेतकरी, बेरोजगार यांच्यासाठी विविध योजना जाहीर केल्या. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी सरकारने 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' सुरु करण्याची घोषणा केली आहे. या योजनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. यावर नाना पटोले यांनी निशाणा साधला.
सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ आली आहे
आता या सरकारला तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने या सरकारला आपली जागा दाखवली आहे. बजेट सादर झाले, घोषणा केल्या गेल्या, पण पैसे कुठून आणणार? याचे उत्तर सरकारकडे नाही. घोषणांचे पालन पूर्णपणे शून्य आहे. सरकार आता खोटे बोलून नेरेटिव्ह सेट करत आहे, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला. वारकरी पंथाची लोक येऊन गेली. वारकरी प्रथेला सुविधा देण्याऐवजी या प्रथेला तोडता कसे येईल, याचा प्रयत्न या सरकारने केला आहे. निरर्थक गवगवा सरकार करत आहे. मुख्यमंत्री तीर्थयात्रा म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाची कढी, असे सगळे झाले आहे. या सरकारचे वास्तविक दर्शन आम्ही मांडणार आहोत, असा इशारा नाना पटोलेंनी दिला.
दरम्यान, वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटच्या पेपर फुटीचे लोण महाराष्ट्रात आले असून याप्रकरणी लातूरमधून काही लोकांना अटक करण्यात आली आहे. पेपरफुटणे ही गंभीर बाब असून अशा पेपर फुटीमुळे शेकडो होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. अशा घटनांना आळा बसावा म्हणून राज्य सरकार पेपर फुटीविरोधात कडक कायदा करणार आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी केला.