Join us  

“कंपन्यांकडून लूट, पीकविम्याचे धोरण बदलून शेतकरी हिताचे करा, शिंदे सरकार...”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 4:32 PM

Congress Nana Patole: महायुतीचे सरकार हे गुजरातधार्जिणे आहे. बेस्टकडे चांगल्या बस असताना वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंच्या मिरवणुकीसाठी गुजरातमधून बस आणणे हा खेळाडूंचा अपमान आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केली.

Congress Nana Patole: राज्यात मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळ आहे. शेतकरी संकटात आहे. असे असताना शेतकऱ्याला मदत मिळत नाही तर दुसरीकडे पिकविमा कंपन्या शेतकऱ्यांच्या जीवावर खिसे भरत आहेत. राज्यातील सरकार पीक विमा कंपन्यांबरोबर आहे, मोदींच्या मित्रांबरोबर आहे. महसूल विभागाची वेबसाईट बंद आहे. या बेवसाईटवर नोंद  झाली नाही तर पीक विमा मिळत नाही. शेतकऱ्यांची लूट करणारे हे पीकविमा धोरण बदलून शेतकरी हिताचे धोरण बनवा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

मागासवर्गीय मुलांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे, ओबीसी मुलांना ५ वर्षांपासून शिष्यवृत्ती दिली जात नाही. ओबीसी समाजाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे व शेतीपासून बरबाद करायचे हे काम भाजपा सरकार करत आहे. सरकारच्या अशा चुकीच्या धोरणाविरोधात आमचा लढा सुरु आहे. शेतकरी, ओबीसी, आदिवासी, एससी, एसटी समाजाच्या हितासाठी काँग्रेस पक्षाचा लढा आहे, असे नाना पटोले म्हणाले.

शेतकरी जगला तर देश जगेल

शेतकरी दुष्काळाचा सामना करत असतानाही शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळत नाही. सरकार ऐकायला तयार नाही. महाराष्ट्रात रोज ४ शेतकरी आत्महत्या होत आहेत. अधिवेशन काळातही या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. शेतकरी जगला तर देश जगेल म्हणूनच संकटातील शेतकऱ्याला आधार देण्यासाठी सरसकट कर्ज माफी जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे हित साधायचे नाही, भाजपाप्रणित शिंदे सरकार हे शेतकरी विरोधी आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

दरम्यान, टी-२० वर्ल्डकप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी राज्य सरकारने गुजरातमधून बस आणली यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील महायुतीचे सरकार हे गुजरातधार्जिणे आहे, मोदी-शाहांना ते त्यांचा आका म्हणतात. बेस्टकडे चांगल्या दर्जाची ओपन बस असताना वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंच्या मिरवणुकीसाठी गुजरातमधून बस आणणे हा खेळाडूंचा अपमान आहे. दिल्लीच्या आदेशावरून गुजरातची बस मुंबईत आणली असावी. खेळाडूंचे कौतुक केले पाहिजे पण त्यासाठी गुजरात समोर झुकण्याची गरज नव्हती, असे नाना पटोले म्हणाले.

 

टॅग्स :काँग्रेसनाना पटोलेनाना पटोलेविधान भवन