Congress Nana Patole News: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान देशाला संदेश देतात. ही परंपरा आहे, पण मागील १० वर्षापासून लाल किल्ल्यावरुन राजकीय भाषणबाजी केली जात आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात शेतकरी, कामगार, देशाचे रक्षण करणारा जवान, बेरोजगारी या महत्वाच्या विषयांवर भाष्य केलेच नाही. पश्चिम बंगाल मध्ये एका डॉक्टर मुलीवर झालेल्या बलात्काराचा मुद्दा उपस्थित करुन त्या राज्याला टार्गेट केले. पश्चिम बंगाल मधील घटनेचे समर्थन कोणीही करत नाही. अशाच व यापेक्षा भयंकर घटना गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह भाजपाशासित राज्यात झाल्या त्यावर पंतप्रधानांनी कधीच भाष्य केले नाही, पण पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षाचे सरकार असल्याने जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले, या शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नाना पटोले बोलत होते. महायुती सरकार हे गुजरातधार्जिणे आहे, हे आम्ही सातत्याने सांगतो आहोत. त्याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. नारपार योजनेतील १२६ टीएमसी पाण्यातील ५० टक्के हिस्सेदारी खान्देशाला मिळाली पाहिजे, अशी स्थानिकांची अपेक्षा होती. पण राज्याच्या वाट्याला केवळ १० टीएमसी पाणी मिळत आहे. बाकीचे पाणी गुजरातला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यावरून हे सरकार गुजरात धार्जिणे आहे हे पुन्हा सिद्ध होत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
तिरंग्याला दुरंग्याच्या संकटापासून वाचवण्याचा संकल्प करा
हजारो शूरवीरांच्या बलिदान, त्याग व संघर्षाने देशाला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून तिरंगा डौलाने फडकत आहे. तिरंग्याची शान कायम ठेवत शेतकरी, कामगार, कष्टकरी, देशाच्या सीमांचे रक्षण करणारा जवान यांनी देश उभा केला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात सुईचे उत्पादनही होत नव्हते पण पंडित नेहरुंच्या कणखर व दूरदृष्टी नेतृत्वाने देशात प्रगतीचा पाया रचला आणि देश संपन्न झाला. ७८ वर्ष हा तिरंगा डौलाना फडकत आहे पण आता तिरंग्याला दुरंग्याच्या संकटापासून वाचवण्याचा संकल्प करा, असे आवाहन नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केले.
दरम्यान, गांधी-नेहरु कुटुंबावर टीका करताना भाजपामधील परिवारवादाकडेही पंतप्रधानांनी लक्ष द्यायला हवे. गांधी-नेहरु कुटुंबाने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्याग केला. या कुटुंबाने आपली संपत्ती देशासाठी दान केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ९ वर्षे जेलमध्ये काढले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसने मोठा संघर्ष केला पण २०१४ साली देशाला स्वातंत्र मिळाले असे माननारे काही लोक आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याचा खरा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहचवण्याची गरज आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.