Join us  

“शिवरायांचा सतत अपमान करणे भाजपाची मानसिकता, राज्य-केंद्रावर गुन्हे दाखल करा”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 3:54 PM

Congress Nana Patole News: छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही.

Congress Nana Patole News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे. राज्य सरकारमधील मंत्री आता आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप आहे. पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराजांचे नाव घेऊन मते मिळवण्यासाठी घाईगडबडीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. मोदी यांच्या हस्ते संसदेचे उद्घाटन केले त्या वास्तूला गळती लागली, अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले मंदिराला गळती लागली, समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले, त्याला भेगा पडल्या, हा नरेंद्र मोदींचा हातगुण म्हणायचे की काय असा प्रश्न पडतो, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला.

महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार हे कमीशनखोर

महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार हे कमीशनखोर आहे, हे सरकार सिमेंट, वाळू, विटा, लोखंड यातही कमीशन खाते, त्यांना कशाचीच लाज वाटत नाही. शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उभारण्याचे काम ठाण्यातील नवखा, अनुभव नसलेला शिल्पकार आपटे याला दिले. या कामावर २.३६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर ५ कोटी रुपये सौंदर्यीकरणावर खर्च करण्यात आले. वास्तविक पाहता छत्रपतींचा पुतळा उभारणीचे काम तज्ञ व अनुभवी व्यक्तीला दिले पाहिजे होते. समुद्रातील खारे पाणी, वाऱ्याचा वेग या सर्व बाबींचा अभ्यास करायला हवा होता पण श्रेय घेण्याच्या आणि कमीशनच्या नादात सरकारने कामाच्या दर्जाकडे लक्ष न देता महाराजांचा अवमान केला आहे, असे नाना पटोले म्हणाले.

दरम्यान,  तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुने आदर्श तर केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी हे नवे आदर्श आहेत असे म्हणत नितीन गडकरींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती, छत्रपती शिवाजी महाराजांचा सतत अपमान करणे हीच भाजप व त्यांच्या सहकाऱ्यांची मानसिकता राहिली आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

 

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजनाना पटोलेनाना पटोलेकाँग्रेस