Join us  

“शेतकऱ्यांबद्दल अजिबात चिंता नाही, वसुलीबाज कृषीमंत्री अब्दुल सत्तारची हकालपट्टी करा”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 2:52 PM

मंत्री झाल्यापासून आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही, अशी टीका करण्यात आली आहे.

Nana Patole: अकोल्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावाने कृषी विभागाने धाडी टाकून व्यावसायिकांकडून पैसे मागितल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या धाड पथकात कृषीमंत्री अब्दूल सत्तारांचा स्विय सहायक दिपक गवळी सह इतर अनेक खाजगी लोकांचा समावेश होता. तर आपल्याच सांगण्यावरून या धाडी टाकण्यात आल्या आहेत, त्यात चुकीचे काहीच झाले नाही असे कृषीमंत्री स्वतःच सांगत आहे. यावरून ते किती निर्ढावलेले आहेत हे दिसून येते. या वसुलीबाज कृषीमंत्र्यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, अब्दुल सत्तार यांना शेतकऱ्यांबद्दल अजिबात चिंता नाही. त्यांनी मंत्री झाल्यापासून आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतक-यांना धीर दिला नाही अडचणींच्या काळात मदत केली नाही. याऊलट सातत्याने बेजबादार विधाने करून शेतक-यांचा आणि कष्टक-यांचा अवमान केला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतक-यांना खते व बियाणे वेळेवर मिळाली पाहिजे याची व्यवस्था करण्याऐवजी कृषीमंत्री आणि त्यांचे कार्यालय धाडी घालून वसुली करण्यात गुंग आहे हे अतीशय गंभीर आहे. या वसुलीबाज कृषीमंत्र्यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

आळंदीत झालेला प्रकार महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेला काळीमा फासणारा

आळंदीत झालेला प्रकार महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेला काळीमा फासणारा आहे. भारतीय जनता पक्षाला खोटे बोल, पण रेटून बोलची विकृती जडलेली आहे. त्याच मुशीत तयार झालेल्या फडणवीसांना आळंदीतला पोलीस अत्याचार दिसत नाही हे कोडगेपणाचे लक्षण आहे. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी फडणवीस आता वारक-यांना दोष देऊन वारीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत भाजपाचा आयटी सेल वारकऱ्यांनाही खोटे ठरवू लागला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारे नाही. शिंदे फडणवीस सरकारने आळंदीत वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, असेही पटोले म्हणाले. 

 

टॅग्स :काँग्रेसनाना पटोलेनाना पटोलेअब्दुल सत्तार