Dhirendra Krishna Shastri In Mumbai: “धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या मुंबईतील कार्यक्रमाला परवानगी देऊ नका”; मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 12:47 PM2023-03-17T12:47:44+5:302023-03-17T12:48:51+5:30
Dhirendra Krishna Shastri In Mumbai: बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Dhirendra Krishna Shastri In Mumbai: गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांवरून बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आहेत. यातच आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम मुंबईत होत असल्याचे सांगितले जात आहे. या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे पत्र दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम १८ मार्च आणि १९ मार्च रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांसाठी या राज्यात जागा नाही. प्रवचनकार धीरेंद्र शास्त्री यांनी जगतगुरू संत तुकाराम महाराजांचा अपमान करून संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे. लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवला आहे. संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला राज्यात कार्यक्रम घेण्यास परवानगी देणे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखं आहे. म्हणूनच धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी नाना पटोले यांनी या पत्रातून केली आहे.
या बागेश्वर बाबावर कडक कारवाई केली जावी
बागेश्वरसारख्या मानसिकतेच्या लोकांना सरकारने लगाम लावला पाहिजे. सरकार स्वतःच अशा लोकांना पाठिंबा देऊन राज्यातील वातावरण बिघडवत असेल तर ही गोष्ट राज्यासाठी चांगली नाही, असे नाना पटोले यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. आम्ही विधान परिषदेत मागणी केली होती की, या बागेश्वर बाबावर कडक कारवाई केली जावी. अंधश्रद्धेला चालना देणाऱ्या या बाबाला राज्यात कार्यक्रमासाठी परवानगी मिळत असेल तर आम्ही त्याचा विरोध करतो, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"