Join us

Maharashtra Political Crisis: अशोक चव्हाण शिंदे गटात नाही, अब्दुल सत्तारांना काँग्रेसमध्ये आणणार? नाना पटोलेंचा मोठा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 12:43 PM

Maharashtra Political Crisis: शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) एकामागून एक बैठकांचा सपाटा सुरू असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. यातच एकनाथ शिंदे गटाला दिवसेंदिवस राज्यभरातून पाठिंबा वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अन्य पक्षातूनही शिंदे गटात येणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. यातच काँग्रेसमधील एक माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. याचे कारण म्हणजे शिंदे गटातील कृषितमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट. याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना मोठा दावा केला आहे. 

आताच्या घडीला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. नव्या शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असून, विरोधक महाविकास आघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. यातच आता अब्दुल सत्तारांनीअशोक चव्हाणांची भेट घेतली. यानंतर नाराज असलेले अशोक चव्हाण आता शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत. यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य करताना मोठा दावा केला आहे. 

अशोक चव्हाण अब्दुल सत्तारांना काँग्रेसमध्ये आणणार?

विधिमंडळ परिसरात नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी पत्रकारांनी अब्दुल सत्तार आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीबाबत नाना पटोले यांना प्रश्न विचारला. यावेळी बोलताना, अशोक चव्हाण आमचे नेते आहेत. अब्दुल सत्तार हे त्यांचे एका काळातील कार्यकर्ते होते. त्यामुळे आता पक्षवाढीसाठी अशोक चव्हाण पुढाकार घेत असतील आणि अब्दुल सत्तारांनाच जर... याबाबत माझी अद्याप चर्चा झालेली नाही. झाली की तुम्हाला कळवतो, असे नाना पटोले म्हणाले. 

अब्दुल सत्तारांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट

अब्दुल सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. याबाबत बोलताना, अशोक चव्हाण यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला गेलो होतो. अशोक चव्हाण यांना मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्राविषयी चांगले ज्ञान आणि समज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीही त्यांना चांगली जाण आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्यासोबतच मी कृषिमंत्री म्हणून माझे खाते सांभाळण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेईन, असे त्यांनी सांगितले. 

अशोक चव्हाण नाराज?

ही भेट शिष्टाचाराचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी चव्हाण हे पक्षनेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशीही ते सभागृहात गैरहजर होते. दरम्यान, अलीकडेच अस्लम शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली होती. या भेटीनंतर अस्लम शेख लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. एवढेच नाही तर त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेही नाव समोर येत होते. हे दोन्ही नेते काँग्रेस सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात, असा दावा केला जात असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळनाना पटोलेअशोक चव्हाणअब्दुल सत्तारएकनाथ शिंदे