मुंबई: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहेत. संजय राऊत यांनी भाजप आणि तपास यंत्रणा विरोधात दंड थोपटले असून, सगळ्यांना कळेल आता महाराष्ट्र काय आहे? भाजपने पत्रकार परिषद जरुर पाहावीच. भाजपचे साडेतीन शहाणे अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. याबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना याबाबत विचारणा करण्यात आली.
आम्ही खूप सहन केले आहे. बर्बाद आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेले आहे? आता बघाच, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. यावर बोलताना नाना पटोले यांनी उद्याचा पेपर आजच का फोडू असा उलटप्रश्न माध्यमांना केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा नाना पटोले यांनी केली होती. त्यानुसार, आंदोलनाला सुरुवात झाली. परंतु, काही वेळातच मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये, या कारणास्तव काँग्रेसने हे आंदोलन थांबवले. यानंतर नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला.
त्यांचा पेपर मी का फोडू?
संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत, ज्या साडेतीन शहाण्यांबद्दल बोलणार आहेत, त्यांचा पेपर मी का फोडू? त्या साडेतीन शहाण्यांना आता झोप लागणार नाही, मला माहितीय ते कोण आहेत? पण जरा सस्पेन्स राहू देत. काही दीडशहाणे आहेत, त्यामुळे ते साडेतीन शहाणे आहेत, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
दरम्यान, भाजपचे साडे तीन लोक हे त्याच अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील. महाराष्ट्रात सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचे ते करा. आता मी घाबरणार नाही, असे राऊतांनी म्हटले आहे.