Join us

“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 15:25 IST

Congress Nana Patole News: महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा मानस जनतेने केला आहे.

Congress Nana Patole News: एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपांवरून बैठकांचे, चर्चांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू एकत्रितपणे परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी करत सक्षम पर्याय देण्यासाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत. यातच मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत चढाओढ असल्याचे दिसत आहे. यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाचे सरकार येणार यावरून अनेक दावे, प्रतिदावे केले जात आहेत.

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कसलेही मतभेद नाहीत. आघाडीच्या राजकारणात प्रत्येक पक्ष आपल्याला जागा मिळावी, याचा विचार करत असतो. महायुतीमध्ये जागा वाटपावरून महाभारत सुरु आहे ते पहावे. त्यांचा मुख्यमंत्री कोण होणार हे त्यांना विचारा, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. 

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल

मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपा सरकारने १० वर्षात महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे. भ्रष्टाचारात भाजपा सरकारने विक्रम केला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाहीत. महागाई प्रचंड वाढली आहे, अशी अवस्था असून या महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा मानस जनतेने केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा मोठा दावा नाना पटोले यांनी केला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांचे नाव सातत्याने घेत असतात पण ते गांधीजींचा आदर्श तसेच गांधीजींनी घालून दिलेला अहिंसेच्या मार्गाचे पालन करताना दिसत नाहीत. जातीच्या धर्माच्या नावावर लोकांमध्ये फुट पाडण्याचे काम ते करत आहेत, हे देशाच्या हिताचे नाही. देशाच्या विकास व प्रगतीसाठी गांधी विचारच महत्वाचा आहे त्याचा अवलंब त्यांनी करावा, असे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४काँग्रेसनाना पटोलेनाना पटोलेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाविकास आघाडी