Join us

“हमीभावाचा फुलप्रुफ कायदा येईपर्यंत शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणार नाही”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 5:42 PM

शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा फुलप्रुफ कायदा सरकार आणत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणार नाही, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

मुंबई: केंद्रातील भाजपाच्या सरकारने अन्नदात्याची मोठी हालअपेष्टा केली. सत्तेत येण्यापूर्वी मोठी आश्वासने दिली पण सत्तेत येतात भाजपाचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले. तीन काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांना संपवण्याचे षडयंत्र आखले होते त्याला विरोध करत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले शेवटी कायदे मागे घेत असल्याची घोषणा सरकारला करावी लागली. पण या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही म्हणून जोपर्यंत संसदेत तीन काळे कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा फुलप्रुफ कायदा सरकार आणत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा महाराष्ट्रने २७ व २८  नोव्हेंबर या कालावधीत शहीद किसान अस्थिकलश मानवंदना आणि संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीचे आयोजन केले आहे. यासंदर्भातील आयोजित पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक, डाव्या पक्षाचे प्रकाश रेड्डी, काँग्रसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, भाकपा, माकप, जनता दल, समाजवादी पक्ष व इतर समविचारी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले की, काळ्या कायद्यांविरोधातील लढाईत शेतकऱ्याला मोठी किंमत मोजावी लागली आहे. वर्षभर हा संघर्ष चालला त्यात ७०० शेतकऱ्यांचा बळी गेला. शेतकऱ्यांवर मोदी सरकारने प्रचंड अत्याचार केले. लाल किल्ल्याचे प्रकरण पुढे करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. तर लखमीपूर खेरीमध्ये मोदी सरकारमधील गृहराज्यमंत्र्याच्या मुलाने शेतकरी व एका पत्रकराला गाडीखाली चिरडून मारले. त्या मंत्र्यांची हकालपट्टी अजून झालेली नाही, ती झाली पाहिजे. देश व लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई सुरु आहे.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक म्हणाले की, शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदींना मागे हटवण्यास प्रवृत्त करुन कायदे रद्द करण्यास भाग पाडले पण त्यासाठी ७०० शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. पण उत्तर प्रदेश पंजाबमधील आगामी निवडणुकीत भाजपा हारणार असे दिसत असल्यामुळे मोदींनी हे कायदे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण शेतकऱ्याच्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. एमएसपीचा कायदा बनवला पाहिजे, शेतकऱ्यांना स्वस्त वीज मिळाली पाहिजे आणि आंदोलनादरम्यान मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटी रुपये द्यावेत या त्यांचा मागण्या आहेत त्या सरकारने मान्य कराव्यात. भाजपा हा शेतकऱ्यांचा पक्ष नाही तो शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष आहे.

दरम्यान, लखीमपूर खेरी मधील हुतात्मा शेतकऱ्यांचा अस्थिकलश महाराष्ट्रात आणला जात असून २७ तारखेला तो मुंबईतील शिवाजी पार्क, चैत्यभूमी, बाबू गेणू स्मारक, हुतात्मा चौक या पवित्र ठिकाणी नेण्यात येणार असून महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ त्याचा समारोप होईल. तर २८ तारखेला संयुक्त किसान मोर्चा आयोजित मेळावा होत आहे. या मेळाव्याला संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत, डॉ. दर्शन पाल, हनन मुल्ला हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना इतर राजकीय पक्ष शेतकरी व कामगारही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. 

टॅग्स :नाना पटोलेनवाब मलिकमहाविकास आघाडीशेतकरी आंदोलन