Nana Patole slams Pm Modi: सोनिया गांधी यांची ईडीकडून केली जात असलेली चौकशी केंद्रातील मोदी सरकारच्या इशाऱ्यावरून केली जात आहे. २०१५ साली मोदी सरकारनेच नॅशनल हेराल्ड प्रकरण काही तथ्य नसल्याने बंद केले होते परंतु महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सातत्याने केंद्र सरकारला धारेवर धरत असल्याने ईडीच्या माध्यमातून गांधी कुटुंबाला त्रास दिला जात आहे. काँग्रेस पक्ष अशा हुकूमशाहीसमोर झुकत नाही तर त्याविरोधात आरपारची लढाई लढेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान मोदींना दिला. केंद्र सरकार विरोधात केलेल्या निषेधाच्या भाषणात ते बोलत होते.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, केंद्र सरकारविरोधात जनतेत प्रचंड आक्रोश आहे. मोदी सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. विरोधकांना नाहक त्रास देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्र स्वातंत्र्य चळवळीत इंग्रज सत्तविरोदात आवाज उठवलेला आहे. आणि ज्यांचा स्वातंत्र्यचळवळीत काहीही संबंध नाही हे लोक आज देश विकून देश चालवत आहेत.
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. "देशात महागाई प्रचंड वाढली आहे. अन्नधान्य, दूध, दही, पनीर, मीठ, आट्यावरही मोदी सरकारने जीएसटी लावून सामान्यांचे जगणे कठीण केले आहे. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, अर्थव्यवस्था रसातळाली गेली आहे. मोदी सरकारकडे यावर उत्तर नाही म्हणून देशातील ज्वलंत प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठी काँग्रेसला जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे", असे ते म्हणाले.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, देशात सर्वसामान्य जनतेचे जगणे महागाईने कठीण केले आहे. बेरोजगारी वाढली आहे, देशातील एक एक कंपनी विकली. यावर सोनिया आणि राहुल गांधी व काँग्रेस पक्ष जाब विचारतो म्हणून त्यांचा आवाज दाबण्यासाठी सुडबुद्धीने कारवाई केली जात आहे. मोदी सरकार स्वतःचे अपयश लपवण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून काँग्रेसला घाबरवू पाहत आहे पण काँग्रेस याला भीक घालणार नाही, असेही जगताप म्हणाले.