मुंबई - एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत मुंबई मेट्रो कारशेड आरे मध्येच होईल असे जाहीर करून भाजप प्रणित राज्य सरकारने पहिला घाव मुंबईकरांवर घातला आहे. पर्यावरणाचा विचार करून आरे मधील कारशेड कांजूरमार्ग येथे करण्याचे प्रस्तावित केला आहे परंतु पुन्हा आरेमध्येच कारशेड करण्याचा आग्रह धरणे म्हणजे मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ चालवलेला आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आरे मेट्रो कारशेड करण्यास पर्यावरणप्रेमी व मुंबईकर यांचा तीव्र विरोध आहे. कारशेड आरेमध्ये होऊ नये यासाठी मुंबईकर व हजारो पर्यावरणप्रेमींनी तत्कालीन फडणवीस सरकारविरोधात मोठे आंदोलन केले होते. पण पोलिसी बळाचा वापर करून फडणवीस सरकारने आंदोलकर्त्यांवर कारवाई केली आणि रात्रीत हजारो झाडांच्या कत्तली केल्या. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने आरेमध्ये कारशेड न करण्याचा निर्णय घेतला. कारशेडसाठी कांजूर मार्ग येथील शेकडो एकर जागेचा विचार करण्यात आला परंतु त्यात केंद्र सरकार व विरोधकांनी खोडा घातला.
आरे येथील कारशेडला मुंबईकरांचा विरोध होणार हे माहीत असतानाही कारशेडसाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले व मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तलही करण्यात आली. विकास कामाला आमचा विरोध नाही, मुंबई मेट्रो प्रकल्पालाही विरोध नाही. मुंबईतील दळणवळणाचा विचार करून मेट्रो प्रकल्प करण्याचा निर्णय सर्वात प्रथम काँग्रेस आघाडीचे सरकार असतानाच घेतला होता. काँग्रेस पक्ष विकासाच्या आड येणारा किंवा विरोधाला विरोध करणारा नाही. विकास झाला पाहिजे पण पर्यावरणाचा ऱ्हास करून जनतेच्या मुळावर येणारा नसावा अशी आमची भूमिका आहे. आरे मध्येच कारशेड करण्याचा आग्रह होत असेल तर तो कोणाचे हितसंबंध जोपासण्यासाठी होत आहे हे जनतेला समजले पाहिजे, असेही पटोले म्हणाले.