मुंबई: काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रपणे लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली. ते शनिवारी गोंदियात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांची आघाडी होणार असल्याचे सांगितले. सध्या भंडारा-गोंदिया आणि पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे. काही वेळापूर्वी दिल्लीत राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट झाली. त्यावेळी केवळ हीच निवडणूक नव्हे तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढावे, अशी चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली. येत्या दोन दिवसांत यावर शिक्कामोर्तब होईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीने नुकतीच विधानपरिषद निवडणुकांसाठी युती केली होती. दोन्ही पक्षांनी 50-50 चा फॉर्म्युला मान्य केला होता. त्यानुसार अमरावती, परभणी-हिंगोली व चंद्रपूर या जागांवर काँग्रेस लढेल. तर लातूर, कोकण आणि नाशिकची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे.
तत्पूर्वी या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसंदर्भातही भाष्य केले. भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल. येत्या 9 तारखेला उमेदवार घोषित करु. खासदारकीचा राजीनामा देत, भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. ते मला लहान भावासारखे आहेत. येणाऱ्या काळात सोबत कार्य करु, असे पटेल यांनी सांगितले.