Join us  

"ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मैदान भरेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 2:35 PM

दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी व्हावी यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू आहेत

मुंबई - शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा लक्षणीय ठरणार आहे. कारण, इतिहासात प्रथमच शिवसेनेकडून दोन दसरा मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेतील फुटीरतावादी शिंदे गटानेही बीकेसी मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. तर, पारंपरिक शिवाजी पार्क येथे ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. त्यामुळे, खरी शिवसेना आमचीच हा वा चांगलाच पेटला आहे. त्यात, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठाकरेंच्या शिवसेनेला समर्थन दिलं आहे. त्यावरुन भाजप नेते आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर टिका केली. तसेच, शिवसेनेच्या मेळाव्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीच गर्दी दिसणार असल्याचंही ते म्हणाले. 

दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी व्हावी यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. शिंदे-ठाकरे गटाने दसरा मेळाव्यासाठी टीझर प्रसिद्ध केले आहेत. शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यात मातोश्रीबाहेर लावलेल्या एका बॅनरनं सगळ्यांचे लक्ष वेधले. दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहावी यासाठी राष्ट्रवादीकडून बॅनर्स लावण्यात आले आहे. या बॅनरवर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सचिन अहिर, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. एक संघटना, एक विचार आणि एकच मैदान शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरा अखंड राहू द्या असं सांगत खूप खूप शुभेच्छा राष्ट्रवादीकडून देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे मुंबई सचिव दिनेशचंद्र हुलवळे, राजू घुगे यांनी हे बॅनर्स लावले आहेत. त्यावर, आता भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. 

दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान भरावं म्हणून पेंग्विन सेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडं याचना केली आहे. त्यामुळे, हे मैदाना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भरणार आहे, असे राम कदम यांनी म्हटलं. पोस्टर लावले त्यात नवीन काही नाही. मात्र, आमदार, खासदार शिवसेनेला सोडून गेले आहेत, बाळासाहेबांच्या विचारांना सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले. त्यामुळेच, आता उरले-सुरलेही आमदार खासदार सोडून जात आहेत, तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ ठाकरेंना सोडवत नाही, असे कदम यांनी म्हटले. 

राष्ट्रवादीच्या सन्माननीय नेत्यांचा जो मानस होता की, शिवसेनेच्या मी ठिकऱ्या ठिकऱ्या करीन, शिवसेनेला मी संपवेन, त्यांचं ते स्वप्न पूर्णत्त्वास जाताना महाराष्ट्रात दिसून येत आहे. आम्ही उद्धव ठाकरेंची शिवसेना मानत नाही, एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे, त्यांचीच शिवसेना आम्ही मानतो, असेही राम कदम यांनी मीडियाशी बोलताना म्हटले. 

शिंदे गटाला दिल्लीतून येतोय पैसा

आरोप करणारे करत असतात, आता आम्हीही बातमी वाचली की शिंदे गटाच्या बीकेसी मैदानातील मेळाव्याला महाराष्ट्रात ३ हजार बसेस येत आहेत. मग, या खर्चांसाठी कोण स्पॉन्सर्स करत आहे. भाजपच या गटाला पैसा पुरवत आहे, दिल्लीतून पैसा येतोय. अजून यांचा पक्ष नाही, संघटना बांधली जात नाही, तरीही अशा पद्धतीने पैसा खर्च केला जातोय, तो कोठून येतो, असे म्हणत भाजपकडूनच शिंदे गटाला रसद पुरवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेराम कदममुंबईराष्ट्रवादी काँग्रेस