काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरण; मनसे नेते संदीप देशपांडे यांना अखेर जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 04:31 AM2017-12-08T04:31:40+5:302017-12-08T09:50:18+5:30
काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह आठही जणांना अखेर गुरुवारी जामीन मिळाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
मुंबई : काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह आठही जणांना अखेर गुरुवारी जामीन मिळाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सलग चार दिवस त्यांनी आर्थर रोड कारागृहात काढले. १५ हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली आहे.
मनसे कार्यकर्त्यांनी १ डिसेंबरला काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश चिल्ले, विशाल कोकणे, हरीश सोळुंकी आणि दिवाकर पडवळ यांना अटक केली. ४ डिसेंबरला त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आठही जणांविरुद्ध दाखल गुन्ह्यांमध्ये ४५२ या अजामीनपात्र कलमामुळे बुधवारी त्यांचा जामीन फेटाळण्यात आला. मात्र, गुरुवारी सत्र न्यायालयाने गुन्ह्याअंतर्गत आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर आठवड्याला पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका केली आहे.