Join us  

"न्यायप्रक्रियेत भाजपचा कार्यकर्ता कशाला?"; उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 6:49 PM

उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने काँग्रेसने याचा विरोध केला आहे.

lawyer Ujjwal Nikam : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार जेष्ठ वकील उज्वल निकम यांचा पराभव झाला. उज्जव निकम हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा जवळपास १६ हजार मतांनी पराभव केला. मात्र या पराभवानंतर उज्जव निकम यांच्या खाद्यांवर सरकारने पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, काँग्रेसनेउज्ज्वल निकम यांच्या फेरनियुक्तीला विरोध केला आहे. न्यायप्रक्रियेत भाजपचा कार्यकर्ता कशाला असा सवाल नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केला.

उत्तर मध्य मुंबईतून वकील उज्जव निकम यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत निकम यांना वर्षा गायकवाड यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं. मात्र या पराभवानंतर उज्ज्वल निकम यांची सरकारी वकीलपदी पुन्हा फेरनियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निकम यांनी आपल्या विशेष सरकारी वकिल पदाचा राजीनामा दिला होता.  त्यानंतर राज्य शासनाने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम २४ (८) नुसार त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून फेरनियुक्ती केली आहे. त्यामुळे राज्यभरात विविध जिल्ह्यातील २९ प्रकरणात ते पुन्हा काम पाहणार आहेत.

मात्र आता उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकील पदाच्या नियुक्तीस काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. "राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने न्याय व्यवस्थेत आपली माणसे घुसवून पाप केले आहे. उज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करुन भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकील पदाच्या नियुक्तीस काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून सरकारने त्याचा फेरविचार करावा," अशी नाना पटोले यांनी केली.

व्हिडीओ दाखवून बदनामी करण्याचा प्रयत्न

"माझ्याबद्दलचा एक व्हिडिओ दाखवून मला जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे पण त्यात काही तथ्य नाही. अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना संत गजानन महाराजांची पालखी तेथे आली होती, मी वारकरी संप्रदायाचा असून गजानन महाराजांचे दर्शन घेण्यास गेलो असताना चिखलाने पाय माखले होते. एका कार्यकर्त्यांने पायावर पाणी टाकले आणि मी माझ्या हाताने माझे पाय धुतले. मी शेतकरी माणूस आहे, मला चिखलाची सवय आहे, जे काही झाले ते दिवसाच्या स्वच्छ प्रकाशात झाले आहे. त्यात लपवण्यासारखे काहीच नाही. पण ज्या लोकांचे पाय ईडी कारवायात माखलेले आहेत, ते रात्रीच्या अंधारात ज्यांचे पाय धुतात, पाय चेपून देतात त्यांच्याबद्दल काही तरी बोलले पाहिजे, तेही दाखवले पाहिजे पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते," असेही नाना पटोले म्हणाले.  

टॅग्स :महाराष्ट्रउज्ज्वल निकमनाना पटोलेकाँग्रेस