मुंबई- महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रजा या बिगर शासकीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात केवळ दहा टक्केच नगरसेवक ए, बी, श्रेणी मिळवित अव्वल ठरले आहेत. तर २०१७ ते २०२१ या काळातील त्यांच्या कामगिरीसाठी ९० टक्के नगरसेवकांना ७० टक्क्यांहून कमी गुण मिळाले आहेत. या परीक्षेत काँग्रेस पक्ष बेस्ट ठरला असून विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे २२७ वॉर्डांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांच्या कामगिरीचे प्रगतिपुस्तक प्रजा या संस्थेने तयार केले आहे. यामध्ये २२० नगरसेवकांपैकी १९८ नगरसेवकांना सी, डी, ई, एफ श्रेणी म्हणजेच ७० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. तर ८० ते १०० टक्के गुण मिळवणारे केवळ दोनच नगरसेवक आढळून आले आहेत.
काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर एआयएमआयएम या पक्षाच्या वांद्रा - कुर्ला संकुल येथील नगरसेविका गुलनाज कुरेशी यांना शेवटचा क्रमांक मिळाला आहे. दरम्यान, प्रभादेवी येथून शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदाच निवडून आलेले समाधान सरवणकर यांनी दुसरा तर भाजपचे हरीश छेडा यांना तिसरा क्रमांक मिळाला आहे.
दांडीबहाद्दरांचे प्रमाण वाढले....पालिकेच्या विविध समित्या व प्रत्येक महिन्यात होणाऱ्या किमान चार महा सभेत २२७ नगरसेवक हजेरी लावून आपल्या प्रभागातील समस्या मांडत असतात. २०१७ - २०१८ या पहिल्याच वर्षी ८२.१५ टक्के नगरसेवक सभांमध्ये हजर होते. परंतु, २०१९ - २०२० मध्ये हे प्रमाण ७३.७० टक्क्यांवर आले आहे.
नागरिकांना प्राधान्य नाही....वर्षभराच्या कालावधीत ५० टक्के म्हणजे ११५ नगरसेवकांनी १७ प्रश्न विविध समितीच्या बैठकीत उपस्थित केले. मात्र यापैकी ९९ टक्के नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देण्यात आलेले नव्हते, असे या सर्वेक्षणात दिसून आले.