Join us

ऊर्मिला मातोंडकरांच्या राजीनाम्याचे उमटले जोरदार पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 9:02 PM

काँग्रेस नेत्या व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काल काँगेसचा राजीनामा दिल्याने काँग्रेस मध्ये खळबळ आणि जोरदार पडसाद उमटले आहेत.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - काँग्रेस नेत्या व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काल काँगेसचा राजीनामा दिल्याने काँग्रेस मध्ये खळबळ आणि जोरदार पडसाद उमटले आहेत. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी उत्तर मुंबई लोकसभेतून पळ काढला आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. भाजपा चा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचे चांगले कार्यकर्ते उरले नाहीत. इसको निपटाया उसको निपटाया ह्या धोरणापायी सगळे महत्वाचे कार्यकर्ते घरी बसले- उरलेले भाजपा शिवसेनेत गेले.

पक्ष श्रेठीनी निरुपम यांना कधी जाब विचारला नाही त्यामुळे मुंबई काँग्रेस चे वातावरण गढूळ होत गेले. मुंबई अध्यक्ष पदाचा शक्य तितका गैरवापर करून मनमानी करून वाटेल तशी तिकिटे वाटून संजय निरुपम यांनी आधीच पक्षाला अडचणीत आणले अशी माहिती काँगेसचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलतांना दिली.

निरुपम नंतर मिलिंद देवरा हे काही काळ मुंबई काँगेसचे अध्यक्ष झाले,मात्र त्यांचे मन रमले नाही! उर्मिला मातोंडकर यांना प्रचाराचे मिळालेले 20 दिवस त्यांनी स्वतःच्या जोरावर व काही प्रामाणिक पदाधिकाऱ्यांच्या जोरावर प्रचाराचे शिवधनुष्य लीलया पेलले. प्रचाराच्या दरम्यान भूषण पाटील हे काही दिवस मुंबईच्या बाहेर गेले. संदेश कोंडविलकर देखील मतगणना आणि महत्वाच्या वेळी गैरहजर होते , सहकार्य करत नव्हते, अशी माहिती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतला दिली.संदेश कोंडविलकर, भूषण पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक सूत्राळे यांनी कधीही कोणतीही निवडणूक जिंकलेली नसून चांगल्या कार्यकर्त्यांना त्रास देणे हेच  धोरण त्यांनी अवलंबले असल्याचा आरोप त्यांनी केला.

सतत 15 वर्षे जिल्हाध्यक्षपदी राहून अशोक सूत्राळे यांनी फक्त स्वतःच्या कुटुंबियांना तिकिटे देणे, मुलाला तिकीट देणे हेच उद्योग केले. पक्षाची वाताहत करण्याची मुख्य जबाबदारी अशोक सूत्राळे यांनी पार पडल्याचा आरोप लोकसभा निवडणुकी नंतर च्या दिल्ली निरीक्षकांच्या समोर झालेल्या बैठकीत मांडण्यात आला. तसेच ऊर्मिला मातोंडकर यांनी वारंवार या गोष्टी पक्षाच्या निरीक्षकांच्या समोर मांडल्या परंतू त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही अशी माहिती सूत्रांनी लोकमतशी बोलतांना केला.

संघटनतील सर्व ब्लॉक अध्यक्ष ह्यांनी आपापसात वाटून घेतले असल्याने ते देखील यांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत असे जेष्ठ महिला पदाधिकार्याने सांगितले.ऊर्मिला मातोंडकर यांना जास्तीत जास्त त्रास द्यायचा जेणे करून त्या रागाच्या भरात कठोर निर्णय घेतील, एखादे चुकीचे विधान करतील किंवा पक्ष सोडतील अशी या त्रिकुटाची योजना होती. 

मिलिंद देवरा यांनी ऊर्मिला मातोंडकर यांनी  केलेल्या तक्रारीवर काहीही कारवाई केली नाही उलट संदेश कोंडविलकर यांना मीडिया कमिटीत पद देऊन उर्मिला यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.

ऊर्मिला मातोंडकर आपल्या मतदारसंघात यायला हवी अशी संपूर्ण महाराष्ट्रातील नेत्यांची , माजी मंत्र्यांची इच्छा आहे.परंतू ऊर्मिला मातोंडकर यांनी मांडलेल्या तक्रारींवर काहीच कारवाई करायची नाही हा दुटप्पीपणा काँग्रेस कडून होत आहे.महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना देखील सर्व प्रकरण माहीत होते तरी देखील ते निष्क्रिय राहिले. त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही असे समजते.

रत्नागिरी, पालघर, वसई चे जिल्हाध्यक्ष त्यांनी बदलले परंतु उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष बदलायला त्यांना वेळ नाही. उत्तर मुंबई लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 464,028 मतांनी उर्मिला पराभूत झाली तरी तेच जिल्हाध्यक्ष, तेच ब्लॉक अध्यक्ष तेच भूषण पाटील , संदेश कोंडविलकर रणनीतिकार बनून फिरतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई पक्षाला करावीशी वाटत नाही. यामुळेच पक्ष संपत चालला आहे. भाजपला जिंकविण्यासाठी पक्षातील काही शुक्राचार्य काम करत असल्याची माहिती देखील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

स्वतःच्या मुलाला 2017 च्या पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधून तिकीट देण्यासाठी अशोक सूत्राळे यांनी संजय निरुपम वर प्रचंड दबाव आणला होता. बोरिवली विधानसभा क्षेत्रात राहत असलेल्या सूत्राळे यांनी आपल्या मुलांसाठी दहिसर विधानसभेमधील प्रभाग 8 मधील खुल्या गटातून उमेदवारी घेऊन स्थानिकांवर अन्याय केला. संजय निरुपम यांनी  देखील तिकिटे वाटताना प्रचंड मनमानी करून प्रामाणिक कार्यकर्त्यांना पक्ष सोडायला काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रवृत्त केले अशी भूमिका काँग्रेस सोडलेल्या पदाधिकाऱ्यांनी मांडले.एवढेच नव्हे तर सूत्राळे यांचा पुत्र मोह इतका की त्यांनी स्वतःच्या मुलाला बोरीवलीत राहत असून दहिसर ला ब्लॉक अध्यक्ष केले.

या सर्व बाबी उर्मिला मातोंडकर यांच्या समोर कार्यकर्त्यांनी मांडल्या. त्यावर संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले, परंतू पक्षाला कसलेही सोयरे सुतक वाटत नाही आणि  आपापसात गलिच्छ राजकारण चालूच आहे, त्याला कंटाळूनच शेवटी ऊर्मिला मातोंडकर यांनी राजीनामा दिला आहे अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

उत्तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष अशोक सूत्राळे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. उलट उत्तर मुंबईत माझ्यासह पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रचारात, पदयात्रा, सभा,घरोघरी प्रचार ते थेट मतमोजणीपर्यंत अहोरात्र मेहनत घेतली. प्रसिद्धीत देखिल त्या आघाडीवर होत्या.त्यामुळे त्यांचे सर्व आरोप बिनबुडाचे आहे असे सूत्राळे यांनी स्पष्ट केले.

2004 मध्ये माजी खासदार गोविंदा यांनी मला उत्तर मुंबई चे अध्यक्ष केले. 2004 व 2009 च्या लोकसभा निवडणूका माझ्या कारकीर्दीत काँग्रेसने जिंकल्या. प्रसिद्धीत देखिल त्या आघाडीवर होत्या. मी ,संदेश कोंडविलकर व भूषण पाटील यांचे राजीनामे घ्या अशी उर्मिला यांची मागणी आहे.एक तर त्यांना राजकारणचा फक्त 20 दिवसांचा व 140 तासांचा अनुभव आहे.काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून आमच्या पक्षाची ध्येय धोरणे आहेत. त्या सांगतील ती पूर्व दिशा होऊ शकत नाही.आमच्या बाबत तरी याबाबत पक्षश्रेष्ठीच योग्य निर्णय घेतील असा टोला त्यांनी लगावला. 

संदेश कोंडविलकर यांनी देखिल उर्मिला मातोंडकर यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट केले. आमच्या उत्तर मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांनी स्वतः पैसे जमा करून अहोरात्र मेहनत करून निवडणूक लढवली.एवढेच काय त्यांच्या मेकअपचा खर्च,राहण्यासाठी,भोजन, निवासस्थान आणि इतर सर्व व्यवस्था आम्ही केली.इतकेच काय तर तुमचे काही मतभेद असतील तर आपण एकत्र बसवून सोडवूया असे देखिल आम्ही त्यांना सांगितले.

मुंबई काँग्रेस सरचिटणीस भूषण पाटील यांनी त्यांच्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले आहे. मी त्यांच्या प्रचारात सक्रिय तर होतोच,आणि सर्व खर्चापासून ते कार्यकर्त्यांच्या प्रचाराच्या सहभाग,पसिद्धी यंत्रणा पूर्णपणे राबवली. उत्तर मुंबईत 5 युतीचे आमदार, 3 विद्यानपरिषद आमदार व 31  युतीचे नगरसेवक असे असतांना आमच्या कार्यकर्त्यांच्या अहोरात्र मेहनतीवर मातोंडकर यांना सुमारे 2,32000 मते मिळाली. उलट काँगेसच्या निवडणूक निरीक्षकांना आम्ही तिघांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी किती मेहनत घेतली हे माहिती आहे असा टोला त्यांनी लगावला.तसेच निरुपम यांच्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे भूषण पाटील यांनी ठामपणे सांगितले.

टॅग्स :उर्मिला मातोंडकरकाँग्रेस