Join us

काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 5:52 AM

काँग्रेसच्या या धोरणामुळे गेल्या ६० वर्षांत देशाचा विकास झाला नाही. विकासासाठी पैशांची नाही, तर धोरणे बदलण्याची गरज आहे, असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : काँग्रेस पक्षाच्या धोरणांमुळे गरिबी, बेकारी आणि भूकबळी यांची वाढ झाली. आमच्या सरकारने राबविलेल्या धोरणांनी देशाचा विकास झाला, असा दावा भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. 

शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना गडकरी यांनी काँग्रेसच्या धोरणांवर टीका केली. तसेच भाजप सरकारच्या काळात झालेल्या कामांचा पाढा वाचला. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिंदे सेनेचे आ. सदा सरवणकर, मनसेचे संदीप देशपांडे, रणजित सावरकर उपस्थित होते. 

कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष संपले. काँग्रेसने याच पक्षांचा मध्य साधणारे धोरण स्वीकारले. काँग्रेसच्या या धोरणामुळे गेल्या ६० वर्षांत देशाचा विकास झाला नाही. विकासासाठी पैशांची नाही, तर धोरणे बदलण्याची गरज आहे, असल्याचे गडकरी म्हणाले. १० वर्षांत ५० लाख कोटी रुपयांची कामे केल्याचा दावाही त्यांनी केला. 

‘पीएपी’चे पाप उद्धव ठाकरेंचे : फडणवीस

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेचे खापर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर फोडतानाच मुलुंड येथील प्रकल्पबाधितांचे (पीएपी) पापही ठाकरे यांचेच असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

उत्तर पूर्वमधील महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारार्थ मुलुंड पूर्वेकडील मिठागर मार्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात चौफेर टोलेबाजी केली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, घाटकोपर येथील होर्डिंगला सर्व परवानग्या उद्धव ठाकरे सरकारच्या काळात देण्यात आल्या होत्या. त्यांच्या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. न्यायालयाचा निकाल येईल तेव्हा येईल मात्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतीने बाहेरच्या प्रकल्पबाधितांचे कोणत्याही परिस्थितीत मुलुंडमध्ये स्थलांतर करणार नाही, तसे आम्ही नक्की केले आहे, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

 

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४नितीन गडकरीनितीन गडकरीमुंबई