Join us

“‘या’ तारखेला अजित पवार मुख्यमंत्री होतील”; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 7:13 PM

Prithviraj Chavan And Ajit Pawar: वापरा आणि फेकून द्या, ही नरेंद्र मोदींची स्टाइल असून, एकनाथ शिंदेंची उपयुक्तता संपली, त्यांचा वापर करून झाला, अशी टीका पृथ्वीराज चव्हाणांनी केली.

Prithviraj Chavan And Ajit Pawar: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अलीकडेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली आणि शिंदे-फडणवीसांच्या सत्तेत सामील झाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा पदभार देण्यात आला. यातच आता अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे दावे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदार करताना पाहायला मिळत आहे. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार केव्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, याची तारीखच सांगितली आहे. 

अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावरच सांगितले होते की, ते लवकरच मुख्यमंत्री बनतील. हे सांगणारा मी पहिला व्यक्ती होतो. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. तर, अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेले आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रामध्ये लवकरच अजित पर्व सुरू होईल, असे ट्विट केले होते. यानंतर आता यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे.  

‘या’ तारखेला अजित पवार मुख्यमंत्री होतील

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार की नाही, हे यावरून ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांचा ठाण्याबाहेर फारसा प्रभाव नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढवण्यास भाजप नेतृत्व तयार नाही. अजित पवार यांना सामावून घेतले आहे, त्यांनाच जबाबदारी देण्यात येऊ शकते, असा दावा करताना १० ऑगस्टपर्यंत विधानसभा अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेचा निर्णय देऊ शकतील. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदावर अजित पवार यांची वर्णी लागू शकते, असे आकलन पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवले. 

दरम्यान, अजित पवार यांची भाजपला गरज आहे. वापरा आणि फेकून द्या, अशी नरेंद्र मोदी यांची स्टाइल आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांचा वापर झालेला आहे. त्यांची उपयुक्तता संपलेली आहे. आता कोण उपयुक्त आहे, ते भाजपवाले ठरवतील, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

 

टॅग्स :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षपृथ्वीराज चव्हाणअजित पवार