Join us

वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी

By मनोहर कुंभेजकर | Published: September 24, 2024 5:13 PM

Congress Priya Dutt, Maharashtra Assembly Elections 2024: राजकीय वर्तुळात प्रिया दत्त यांच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चांना सुरुवात झाली आहे

Congress Priya Dutt, Maharashtra Assembly Elections 2024 | मनोहर कुंभेजकर, मुंबई: वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्राचे २०१४ पासून दोन वेळा आमदार असणारे आमदार व मुंबई भाजप अध्यक्ष अँड. आशिष शेलार यांना घेरण्यासाठी काँग्रेसने नवी खेळी केली आहे. वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रामधून आमदार शेलार यांच्या विरोधात माजी खासदार प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे. मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी मंत्री अस्लम शेख व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी नुकतीच प्रिया दत्त यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात दत्त यांच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चांना सुरुवात झाली. मात्र याबाबत अजून काही निर्णय घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी 'लोकमत'ला दिली.

काँग्रेसच्या कोणत्याही बड्या नेत्याने या वृत्ताला अधिकृत दुजोरा जरी दिलेला नसला तरी प्रिया दत्त यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. वांद्रे पश्चिम हा मतदारसंघ लोकसभेच्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात येतो. याआधी दोन वेळा प्रिया दत्त यांनी लोकसभेत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याआधी त्यांचे वडील दिवंगत अभिनेते सुनील दत्त येथून खासदार होते. त्यामुळं या येथे दत्त कुटुंबीयांचं वर्चस्व आहे. वांद्रे पश्चिम मतदारसंघात बॉलिवूड कलाकारांचं वास्तव्य आहे. शिवाय अल्पसंख्यांक मतदारांची संख्याही लक्षणीय आहे.

या मतदारसंघातून माजी उपमहापौर व प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी गाठी भेटी सुरू केल्या असून त्यांचे नाव देखिल चर्चेत आहे. तर माजी नगरसेवक रफिक झकेरिया,माजी नगरसेवक रहेबार खान हे देखिल तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.तर इतर १६ इच्छुकांनी येथून तिकीट मागितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४काँग्रेसभाजपाआशीष शेलारप्रिया दत्त