लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भाजप कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर निदर्शने केली. भाजपच्या गुंडगिरीचा निषेध करत, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी जयभीमचा नारा दिला.
भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला. यात कार्यालयाची तोडफोड केली. काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांचा विनयभंग करत मारहाण केल्याचा आरोप पक्षाचे प्रवक्ते निजामुद्दीन राईन यांनी केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी सुरू केली आहे. मात्र, अशा भेकड हल्ल्यांनी काँग्रेसचे कार्यकर्ते संविधानिक मार्गाने ठोस उत्तर देतील, असे मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते यांनी सांगितले. पोलिसांनी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रणिल नायर, कोषाध्यक्ष संदीप शुक्ला, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष कचरू यादव, महेंद्र मुणगेकर आदींना ताब्यात घेत आझाद मैदान पोलिस ठाण्यात नेले.