Join us

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस दरात वाढ झाली असून, त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस दरात वाढ झाली असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली असल्याचा आरोप करीत काँग्रेसने देशव्यापी आंदोलन छेडले आहे. या मोहिमेअंतर्गत मुंबई काँग्रेसने बुधवारी मुंबईत ठिकठिकाणी निदर्शने केली.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने वाॅर्डस्तरावर आंदोलनाची घोषणा केली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नेते, आजी-माजी आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागात निषेध आंदोलन केले. भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत आहे. त्यामुळे महागाई वाढली आहे. देशातील प्रत्येक नागरिक या दरवाढीमुळे व महागाईमुळे पोळून निघाल्याचे भाई जगताप म्हणाले. आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती १२० डाॅलर प्रति बॅरल असतानाही काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल ७४ आणि घरगुती गॅस ४१८ रुपये प्रति सिलिंडर होते. तेव्हा हेमा मालिनी, स्मृती इराणी वगैरे भाजप नेत्यांनी गॅस सिलिंडर घेऊन आंदोलन केले होते. आज पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे, तर घरगुती गॅस ९५० रुपये प्रति सिलिंडर आहे. आता स्मृती इराणी, हेमा मालिनी यांना हे वाढलेले दर दिसत नाहीत की, असा प्रश्न भाई जगताप यांनी केला.

इंधनाच्या दरांबाबत काँग्रेस केंद्रातील भाजप सरकारला प्रश्न विचारणार असून, या आंदोलनाची झळ सत्तेत बसलेल्या भाजपपर्यंत पोहोचावी म्हणून देशव्यापी मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशातील महिलांचे आणि प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचे हे आंदोलन आहे. १७ जुलै २०२१ पर्यंत मुंबईभर अशी आंदोलने चालूच राहतील असे भाई जगताप म्हणाले.