Join us

प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपची उमेदवारी कशी? काँग्रेसचा भाजपाला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 5:45 PM

प्रज्ञा सिंह यांना लोकसभेची उमेदवारी देऊन आपण स्वतःच कसे राष्ट्रीय सुरक्षेविषयी गंभीर नाही हे भाजपाने सिद्ध केले आहे असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मोक्काखाली कारवाई झालेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भारतीय जनता पार्टीने भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे, त्यावर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी सवाल उपस्थित केला आहे.

रत्नाकर महाजन पुढे म्हणाले की, प्रज्ञा सिंह यांच्यावरील मोक्का अंतर्गत कारवाई कोर्टाने बरखास्त केली असली तरी अन्य दहशतवादविरोधी कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई चालूच आहे. राष्ट्रीय सुरक्षेविषयी काँग्रेसला चिंता नसल्याचा निराधार व खोटा आरोप काँग्रेसवर करणाऱ्या भाजपाने स्वतः मात्र राष्ट्रीय सुरक्षेशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. प्रज्ञा सिंह यांना लोकसभेची उमेदवारी देऊन आपण स्वतःच कसे राष्ट्रीय सुरक्षेविषयी गंभीर नाही हे सिद्ध केले आहे असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 

मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. बुधवारी भाजपाकडून मध्यप्रदेशातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली यावरुन अनेक वाद निर्माण झाले. 

भोपाळ मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार आलोक सांजर यांनी 7.14 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी.सी.शर्मा यांनी 3.43 लाख मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे.  

साध्वी यांना भाजपाने दिलेल्या उमेदवारीवरुन ओमर अब्दुला यांनीही टीका केली. प्रज्ञा सिंह ठाकूर या दहशतवादाच्या आरोपी आहेत. सध्या त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. त्यांचा कोर्टाने जामीन रद्द केला पाहिजे, जर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची तब्येत ठीक झाली असेल तर त्यांना परत तुरुंगात पाठवले पाहिजे. भोपाळ मतदार संघातून भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. यापेक्षा भाजपाचे मोठे दुर्दैव काय असू शकते असा टोला ओमर अब्दुला यांनी लगावला आहे.  

टॅग्स :लोकसभा निवडणूकभोपाळमध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019भाजपाकाँग्रेस